अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा सर्वाधिक त्रास हा चिखलीकरांना?

2 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

नांदेड : राज्यात काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडकडे पाहिले जाते. आतापर्यंत मागील १७ पैकी १४ वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. भाजपाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन दिग्गज नेते आहेत. चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांच्या रूपानं भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला. २०१९ ला चिखलीकर यांना भाजपनं मैदानात उतरवलं होत त्यात अशोक चव्हाण यांच्यापुढे त्यांनी मोठं आव्हान उभं केलं. चिखलीकर यांनी ४ लाख ८६ हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमकेर ठरले ते वंचितचे उमेदवार, ज्यांनी १ लाख ६६ हजार मतं घेतली. तर अशोक चव्हाण यांना ४ लाख ४६ हजार मतं मिळाली. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला हा दुसरा पराभव ठरला. याआधी डॉ. व्यंकटेश काबदे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भाजपनं लोकसभेची जागा ही २००४ नंतर २०१९ ला जिंकली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणच बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे संपूर्ण राजकारण चव्हाण यांना विरोध याच एका मुद्द्यावर सुरू होते. आता तेच चव्हाण अधिक ताकदीने नांदेडमध्ये आपले वर्चस्व वाढवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नांदेडमधूनच याची सुरुवात होऊ शकते. प्रताप पाटील चिखलीकरांच्या उमेदवारीला कात्री लागून चव्हाण भाजपमध्ये नव्याने ‘अशोक पर्व’ सुरू करू शकतात, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नांदेडची जागा, पर्यायाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची जागा डेंजर झोनमध्ये होते. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नांदेड लोकसभा उमेदवारी संदर्भातही वेगळा विचार केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण – प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील वाद, आरोप-प्रत्यारोप राज्यात चर्चेचा विषय ठरलेले होते. भाजपला चव्हाणांची गरज नाही तर त्यांनाच भाजपची गरज आहे, अशा चिखलीकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत. चिखलीकर लोकसभेचा उमेदवार मीच, असे सांगत प्रचाराला लागले आहेत, पण धक्कातंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पक्षाकडून चिखलीकरांनाच धक्का दिला जातो का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!