अहमदपूर न.प.चा मुख्याधिकारी, नगर रचनाकार लाच घेताना सापडला

लाचखोर मुख्याधिकारी डोईफोडे, नगर रचनाकार कस्तुरेच्या मालमत्तेची खोलात जाऊन तपासणी करा ; आतापर्यंतच्या सर्व गुंठेवारी, दिलेले बांधकाम परवाने संशयास्पद?

2 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे: अहमदपूर नगर परिषदेचा मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व नगर रचनाकार अजय कस्तुरे यास पाच लाखांची लाच घेताना लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व नगर रचनाकार अजय कस्तुरे याची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहेत. सध्या अहमदपूर नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार नगर रचनाकार अजय कस्तुरे याच्याकडे आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मौजे मरशिवणी ता.अहमदपूर जि. लातूर येथील सर्वे नंबर ५६ मधील ३६०० चौ.मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता नगर परिषद अहमदपूर जि.लातूर येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये २५ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रारदार यांनी ऑनलाइन चालान भरणा केलेला आहे. तक्रारदार हे त्यांचे प्रलंबित कामाकरिता ५ फेब्रुवारी २०२४ रोजी नगर परिषद कार्यालय, अहमदपूर येथे गेले असता नगर रचनाकार अजय कस्तुरे यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी नगरपरिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण ७ लाख रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात १३ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक लातूर विभागाच्या पथकाने बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व नगररचनाकार अजय कस्तुरे यानी ७ लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती ५ लाख रूपये स्विकारण्याचे मान्य केले. यानंतर थोड्याच वेळात तक्रारदार नगरपरिषद, अहमदपूर येथे गेले असता आलोसे अजय कस्तुरे याने तक्रारदार यांच्या क्रेटा कारमध्ये लाचेची रक्कम ५ लाख रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्याधिकारी व नगर रचनाकार या दोघांना सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेशकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली. अशा लाचखोर अधिकाऱ्याची खोलातून चौकशी झाली पाहिजे. संपत्तीचीही चौकशी व्हायला हवी. आजवर अनेक ठिकाणी काम केलेल्या लाचखोरांनी मोठा घोटाळा केला असण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!