दुसऱ्यांदा नीटची तयारी करताय मग याचा ‘नीट विचार करा’

3 Min Read

वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेली नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ची परीक्षा नुकतीच ५ मे २०२४ रोजी पार पडली. या परीक्षेला देशभरातून २२ लाखांच्या आसपास विद्यार्थी बसले होते. या परीक्षेद्वारे बहुसंख्य विद्यार्थ्यांना एमबीबीएस या अभ्यासक्रमालाच प्रवेश मिळवायचा असल्याचे चित्र आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसची प्रवेश संख्या जवळपास १,०६,३३३ अशी आहे. त्यापैकी शासकीय महाविद्यालयांतील अंदाजे प्रवेश संख्या ५५,६४८ अशी आहे. शासकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क हे परवडणारे असल्याने या महाविद्यालयातील एमबीबीएसला प्रवेश मिळवणे हे बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, पालकांचाही कल त्याकडेच पहायला मिळतो. कांही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील विद्यार्थी नीट परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थान राज्यातील कोटा या ठिकाणी जायची परंतु मागील काही वर्षांत ही परिस्थिती थोडी बदललेली दिसते. मराठवाड्यातील ‘लातूर पॅटर्न’ मुळे कोट्याकडे जाणारे विद्यार्थी आपल्या राज्यातील लातूरकडे वळल्याचे चित्र आहे. लातूरच्या कांही महाविद्यालयात, कांही शिकवणी वर्गात घेतलेला प्रवेश म्हणजे यशाची हमखास हमी असे बहुतेक पालकांना वाटते. त्यात मोठया प्रमाणात विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र होताना दिसतात तर अखंड अभ्यास एके अभ्यास करूनही बऱ्याच विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे किमान गुण नीटमध्ये मिळत नाहीत, असे विद्यार्थी पुन्हा एका प्रयत्नासाठी आग्रही असतात, बरेच पालकही त्याच विचाराचे असतात. दुसऱ्या प्रयत्नाचा पर्याय स्वीकारणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नाकडे वळण्यापूर्वी या परीक्षेतील अपयशाचे नेमके कारण शोधण्यासाठी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक साधकबाधक विचार करतात काय ? यासाठी शिकवणाऱ्या सरांशी चर्चा करायला हवी. विद्यार्थ्यांची नेमकी अडचण काय, हे समजणे फार आवश्यक ठरते. हजारों प्रश्न पाठ करणे म्हणजे खूप अभ्यास करणे नव्हे तर प्रत्येक विषयातील विषयघटक स्पष्टपणे समजून घेणेच इष्ट ठरते. सगळयांच विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सारखीच असु शकत नसल्याने काहीना काही भाग लवकर समजू शकतो तर काहींना तो भाग समजू शकत नाही, आपणास कोणकोणते घटक सतत कठीण जातात, डोके दुखवतात हे विद्यार्थ्यांना नीटची रिपीट परीक्षा देण्यापूर्वी नक्कीच कळायला हवे. त्याविषयी त्याने शिकवणाऱ्या सरांशी चर्चा करायला हवी. घरीही पालकांना सांगायला हवे. दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी अखंड अभ्यास करताना मागील वर्षीच्या न सुटलेल्या अडचणी सोडवून घेऊन केला तर कोणत्याही घटकांमधील प्रश्न विचारले गेले तर पेपर अवघड जाणार नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज भासू नये.

नीटची परीक्षा दुसऱ्यांदा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तेच तेच वाचून हे तर आपण वाचलेच आहे किंवा हे तर पाठच झाले आहे, असे वाटून विद्यार्थी काही भागाकडे दुर्लक्ष करू शकतो. दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी स्पर्धा आणखी वाढलेली असते. नव्या दमाच्या विद्यार्थ्यांसोबत धावावे लागते. दुसऱ्यांदा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांला आपल्याबरोबरीची मुले पुढे गेली, आपण तिथेच आहोत, याचे थोडे फार शल्य असते. त्याचाही त्यांच्या मनावर सुप्त परिणाम होत असतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या प्रयत्नाचा विचार करताना शिकवणाऱ्या सरांशी चर्चा करायला हवी. सध्याचा काळ प्रचंड गतिमान स्पर्धेचा आहे. त्यामुळे आपली महत्त्वाची वर्षे वाया जाणे याचा अर्थ भविष्यातील आपल्या प्रगतीला खीळ बसणे असा होतो. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी एमबीबीएसच्या पलीकडेही वैद्यकीय क्षेत्र असल्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!