प्रादेशिक परिवहन कार्यालयाला मिळाला पूर्णवेळ कारभारी ; प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी स्वीकारला पदभार

2 Min Read
                                                    ( छायाचित्र : संग्रहित )

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची पदोन्नती, बदलीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून रखडली होती. राज्यभरात बहुतांश कार्यालयांचा कारभार प्रभारींवरच सुरू होता. लातूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जवळपास तीन वर्षांपासून प्रभारीराज सुरू होते. धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२१ पासून प्रभारी कारभार होता. अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने कामाचा ताणही वाढला होता परंतु गुरुवार, दि. ६ जून रोजी परिवहन विभागाच्या वतीने अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती देऊन बदल्या केल्या. यामध्ये लातूर विभाग येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विनोद चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय असलेल्या लातूरला आता पूर्णवेळ कारभारी मिळाला आहे. लातूर येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांची सोलापूर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. तर लातूर विभागाला सातारा येथे कार्यरत असणाऱ्या आणि प्रादेशिक परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद चव्हाण यांनी लातूर विभागाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी सातारा येथे कार्यरत असलेले श्री चव्हाण यांनी सातारा येथील परवाना व्यवस्थांचे संगणकीकरण, नूतन परवाना ऑनलाइन परीक्षा, तसेच विविध सोयीसुविधांकरिता विनोद चव्हाण यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला होता तसेच राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सुद्धा कारवाई करून त्यांनी दीड कोटींपेक्षा अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला होता. साताऱ्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला परिवहन विभागाचा दर्जा देण्याकरता त्यांचे प्रयत्न विशेष ठरले. परिवहन विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी अशी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची ओळख आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!