मुरुड पोलिसांची धडक कारवाई, ३३ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

1 Min Read

»मुखपत्र दक्षता वृत्तांत

मुरुड / प्रतिनिधी : मुरुड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ३३ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी विनापरवाना बेकायदा मद्य साठवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकास मुद्देमालासह अटक केली आहे.

ग्रामीण भागात जादा नफा कमविण्याच्या उद्देशाने अवैध मद्य विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर अंकुश आणण्यासाठी मुरुड पोलिसांनी कंबर कसली असून, मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि व्यंकटेश आलेवार यांनी धडक कारवाई करत देशी विदेशी दारूची अवैध विक्री रोखण्यासाठी कडक मोहीम हाती घेतली आहे. मुरुड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भोयरा रेल्वे स्टेशन जवळील मामा भांजे हॉटेलच्या पाठीमागे सहाय्यक पोलीस निरिक्षक व्यंकटेश आलेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचुन ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी विनापरवाना मद्याची साठवणूक करणाऱ्या इसमाकडून देशी विदेशी कंपनीचा जवळपास ३३ हजार रुपये किंमतीचा मद्य साठा जप्त केला. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी बलभीम माणिकराव कळबंड यास अटक केली. त्‍याच्‍यावर मद्याची विना परवाना अवैध साठवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण सुनिल गोसावी यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि व्यंकटेश आलेवार यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार महेश पवार, रवि कांबळे, जाधव, माने, राठोड आदीनीं ही कारवाई केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!