वरिष्ठ पोलीस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

5 Min Read

संयमी आणि कणखर पोलिस दलात अनेक निर्णय, आदेश अत्यंत शांतपणे आणि संयमाने घ्यावे लागतात. अगदी असाच स्वभाव असलेले शांत आणि संयमी आणि तितकेच कडक शिस्तीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी दिपककुमार वाघमारे यांना पोलीस खात्यातील सर्वोच्च सन्मान असणारे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. शांत स्वभाव, साधे राहणीमान, प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्याचा अनुभव, संघटित गुन्हेगारी- नक्षलवाद नियंत्रणात ठेवण्याचे कसब, निर्णय घेण्याची क्षमता अशा गुणांमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपककुमार वाघमारे यांचा महाराष्ट्र पोलीस सेवेत दबदबा निर्माण झाला आहे. सरळ सेवा पोलीस उप निरीक्षक म्हणून सन – १९९५ च्या बॅचचे असलेल्या श्री.वाघमारे यांनी गडचिरोलीसह राज्य पातळीवर अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून वपोनि दिपककुमार वाघमारे यांची ओळख आहे. त्यांच्या आजवरच्या कामगिरीवर टाकलेला प्रकाश.

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उम्रज या छोट्याशा खेड्यात जन्मलेले दिपककुमार वाघमारे यांचा पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त, कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे पर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आहे. पोलिस दलात कर्तव्यकठोर अशी वपोनि दिपककुमार वाघमारे यांची प्रतिमा आहे. सरळ सेवा भरती १९९५ च्या बॅचचे दिपककुमार वाघमारे हे पोलीस उपनिरीक्षक पदी रुजू झाले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे सध्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. श्री. वाघमारे यांनी गेली २९ वर्षाचे महाराष्ट्र पोलीस सेवेत अनेक संवेदनशिल गुन्हयाची उकल, तपास, दोषसिध्दी केलेली आहे. विशेष सुरक्षा विभाग नांदेड, नांदेड जिल्हा पोलीस, गडचिरोली, हिंगोली, नाशिक ग्रामीण पोलीस दल, अहमदनगर, लातूर मध्ये अतिउत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी ३० प्रशंसापत्रे, २४४ बक्षीसे देवून सन्मानित करण्यात आले आहे. दि. २५ एप्रिल २०२४ रोजी प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस विभागातील सर्वोच्च पुरस्कार असलेले पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर झाला असून दि.१ मे २०२४ रोजी त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

नाशिक ग्रामीण येथे उत्कृष्ट कामगिरी 

राज्यात अतिसंवेदशील शहर म्हणुन ओळखले जाणाऱ्या मालेगाव जि. नाशिक ग्रामीण येथील मालेगाव शहर पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे म्हणून कर्तव्यावर असताना त्यांच्या कार्यकाळात सर्व धर्मीय व सामाजिक सण-उत्सव ज्यात प्रामुख्याने रमजान ईद, श्रीगणेश उत्सव, बकरी ईद, नवरात्र महोत्सव, शिवजयंती महोत्सव, ईद-ए- मिलाद, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, होळी/रंगपंचमी असे सण उत्सव शांततेत पार पाडुन कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.

मालेगाव शहरातील आझादनगर पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे म्हणून कर्तव्यावर असताना आर्थिक फसवणुकीच्या घडलेल्या चार गुन्ह्यात उल्लेखनीय तपास करून एकुण ३६ कोटी ९० लाख रूपयाची रिकव्हरी केली होती.

येवला पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे म्हणून कर्तव्यावर असतांना प्रसिध्द कांदा व्यापाऱ्याच्या पुतण्याचे व त्याचे मित्राचे ३० लाख रूपये खंडणी साठी अज्ञात आरोपीतांनी अपहरण केले होते. या गुन्हयात आरोपी निष्पन्न करून दोन्ही अपहरण झालेल्या मुलांना ४८ तासात आरोपीचे ताब्यातुन मोठया धाडसाने सुखरूप सोडवुन सदर गुन्ह्यातील १३ आरोपीतांना मुद्देमालासह अटक करून जनतेच्या मनात विश्वासहर्ता निर्माण करून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशी कामगिरी केली होती.

अहमदनगर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी 

वाडीवर्डे पोलीस ठाणे येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे कर्तव्यावर असतांना आपल्या हद्दीतील संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ म्हणजेच “मोक्का कायदयाचा” प्रभावीपणे वापर करत शासकीय धान्य घोटाळा प्रकरणी ९ आरोपीतां विरूध्द महाराष्ट्र संघटीत अधिनियम (मोक्का) प्रमाणे कार्यवाही करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

लातूर जिल्ह्यात कौतुकास्पद कामगिरी 

पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे तत्कालीन प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे कर्तव्यावर असतांना माला विरुद्धचे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणून एकुण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन उल्लेखनीय कामगिरी केली होती. विविध मथळयाखाली एकुण ४६८ प्रतिबंधक कार्यवाही केल्या यात प्रामुख्याने गुन्हेगारांचे टोळीला एक वर्षाकरीता स्थानबद्ध कऱण्यात आले होते. तसेच मुंबई दारुबंदी कायदा अन्वये एकुण १५७ प्रकरणे दाखल केली होती. मोटार वाहन कायदयाअंतर्गत एकुण ३०१५ केसेस दाखल करुन तडजोड शुल्क म्हणून २२,६०,४००/- रु आकारुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या उदगीर शहरात तसेच तालूक्यात सर्व सण उत्सव, ग्रामपंचायत निवडणूक ह्या शांततेत पार पाडून कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!