लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर, नरेंद्र मोदी यांची घोषणा

2 Min Read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता आज नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला असून त्यांना भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिल्याचं मोदी म्हणाले. लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. अडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरुवात करुन उपपंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृह खातं आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केलं, असं मोदी म्हणाले.

लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेत देखील त्याचं मोठं योगदान होतं. भाजपच्या स्थापनेनंतर ते १९८६ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले. १९८६ ते १९९० पर्यंत ते अध्यक्ष होते. १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत देखील लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं ससंदीय राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सराकरमध्ये अडवाणी यांनी १९९९ ते २००४ मध्ये देशाचं उपपंतप्रधानपद भूषवलं होतं.

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील सिंध प्रांतात झाला होता. त्यांनी कराचीतील सेंट पॅट्रिक्स स्कूल मध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं काम सुरु केलं. राजस्थानमध्ये आरएसएसचे प्रचारक म्हणून काम केलं. १९५७ मध्ये अडवाणी राजस्थान सोडून दिल्लीत आले. दिल्लीत तीन वर्ष काम केल्यानंतर अडवाणी पत्रकार म्हणून काम करु लागले. त्यांनी संघाच्या ऑर्गनायझरमध्ये सहायक संपादक म्हणून काम केलं. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २ जागांवर विजय मिळाला होता, त्यानंतर अडवाणीकंडे पक्षाची जबाबदारी आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!