२०१७ ला लातूर जिल्ह्यात भाजपाला झिरो टू हिरो बनवणारे संभाजीराव एकाकी?

माझ्याच तिकिटाच फायनल नाही - आ. संभाजी पाटील निलंगेकर 

4 Min Read

लातूर जिल्ह्यात भाजपला झिरो टू हिरो बनवणारे माजी पालकमंत्री संभाजीराव हे एकाकी पडलेत की काय असं म्हंटल तर ते चुकीचे होऊ नये. गेली सात वर्षाचा त्यांचा पक्ष स्तरावरील कारभार पाहिला तर ज्या पद्धतीने सुरुवातीला लातूर शहर महानगर पालिकेत व नंतर जिल्हा परिषदेत भाजपाला झिरो टू हिरो करत सत्तेत आणणारे संभाजीराव यांना स्वतःचाच पक्ष त्यांना पक्षात एकाकी पाडून कसले फळ देत आहे, मग याठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदार संघात संभाजीराव व त्यांचे बंधू अरविंद पाटलांनी केलेले काही अंशी उघड तर कांही अंशी गुप्त पक्षविरोधी काम केल्यानेच एकाकी पाडले जात नाही ना? या चर्चाना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे.

  • २०१४ पूर्वी लातूर जिल्ह्याची भाजप ही देशमुखांच्या गढीच्या दावणीला बांधलेली होती. जिल्ह्यात अनेक आमदार होऊन ही त्यावेळी भाजपाचा नसलेला प्रभाव, नसलेली सत्ता व सर्वात विशेष म्हणजे मुंडेनी लातुरात भाजपचा देशमुखांसोबत कधी छुपा तर कधी उघड केलेला सौदा यामुळे कोणालाही आपला प्रभाव इच्छा असतानाही जिल्ह्यात टाकता आला नाही. २०१४ ला राज्यात भाजपाची सत्ता आली व त्यापूर्वी मुंडेंचे देखील निधन झाले. त्यामुळे भाजप वाढेल अशी चिन्हे दिसू लागली. २०१७ ला लातूर शहर महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या व याठिकाणी कधी नाही ते स्पष्ट बहुमत भाजपला मिळाले. भाजपने लातूर शहर महानगरपालिकेत शून्य ते थेट ३६ अशी मजल मारली आणि लातूर शहर महानगर पालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आली. त्यांनतर २०१७ मध्येच जिल्हा परिषद व जिल्ह्यातील बहुतेक नगर परिषदा, पंचायत समित्या ह्या भाजपकडे इतिहासात पहिल्यांदा आल्या. अर्थात त्यावेळी हे यश सामूहिक असले तरी संभाजी पाटील निलंगेकर हे पालकमंत्री असल्याने त्यांच्याच नेतृत्वाला त्याचे श्रेय द्यावे लागेल किंवा लोकशाहीत हेच अलिखित संकेत असतात. अर्थात ते पाळायचे किंवा मान्य करायचे की नाही हा भाग वेगळा. त्यामुळे जिल्ह्याचा नेता संभाजी पाटील निलंगेकर अशी एक प्रतिमा आपोआप तयार झाली. २०१९ पूर्वी विद्यमान औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. त्याकाळात त्यांनी लातूरच्या वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या. अगदी कमी काळात केलेल्या कामामुळे अभिमन्यू पवार चर्चेत आले. त्याकाळात लातूरचे जिल्हा रुग्णालय, नाट्यगृह, शादीखाना, लिंगायत स्मशानभूमी, विश्रामगृहाची जागा न्यायालयाला देणे असे विषय पवारांनी लावले. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पवारांचे नाव औसा विधानसभा मतदार संघांसाठी पुढे आले. दरम्यान याच काळात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदार संघात संभाजीराव व त्यांचे बंधू अरविंद पाटलांनी केलेले काही अंशी उघड तर कांही अंशी गुप्त पक्षविरोधी काम केल्यानेच पुढे चालून लातूर जिल्हा भाजपात गटबाजी उफाळून आली असून एकमेकांना शह देण्यात दोन्ही गट कुठलीच संधी सोडताना दिसत नाहीत. या अंतरकलहामुळे नवरा मेला हरकत नाही पण सवत रंडकी झाली पाहिजे! अशी अवस्था लातूर जिल्हा भाजपाची झाल्याचे दिसते. त्यात २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे पक्ष नेतृत्व ही गटबाजी मोडून काढण्यात यशस्वी होते का याची वाट पहावी लागेल अन्यथा वाट तर भाजपची यापूर्वीच लातूर जिल्ह्यात ठरवून पद्धतशीर लावली गेली आहे हे काही वेगळे सांगायला कुण्या तज्ज्ञाची गरज नाही. लातूर जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व कोणाकडे ? या शीतयुद्धातून जिल्ह्यात गटागटात विभागलेली भाजपा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येणार की, नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माझ्याच तिकिटाच फायनल नाही – आ.संभाजी पाटील निलंगेकर

भाजपातर्फे ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ही आ. निलंगेकरांसोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष सोडले तर अन्य कोणतेही मोठे नेते सोबत नसल्याचे दिसले. त्यामुळे २०१७ ला लातूर जिल्ह्यात भाजपाला झिरो टू हिरो बनवणारे संभाजीराव एकाकी तर पडले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना “माझ्याच तिकिटाचे मला माहिती नाही, तेंव्हा खासदारकीच्या उमेदवारी बद्दल कसे सांगू असे वक्तव्य करून खासदारकीच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम ठेवला .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!