लातूर : वलांडी अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी लातूर जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवित शांततेत श्री आई जगदंबा गोलाई मंदिर ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ऐतिहासिक मोर्चा काढला. यामोर्चामध्ये सकल हिंदू समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. मोर्चा नंतर मुलीं- महिलांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाजात लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबावेत आणि या घृणास्पद गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब बसणं आवश्यक आहे. या अत्याचारांना बळी पडलेल्या लहान मनांच्या निरागस मनावर यामुळे फार मोठा आघात पोहचतो. त्यांना या धक्क्यातून सावरणं बऱ्याचदा अवघड जातं. कोणतीही चूक नसताना त्यांना कमी वयात या सर्वांतून जावं लागतं हे फार त्रासदायक असतं. लहान मुलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच अत्याचाराची हादरवून सोडणारी आणि संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात समोर आली. २० वर्षीय नराधमाने अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात घडली. याप्रकरणी देवणी पोलिसांनी गुरनं २८/२०२४ दि.२५.०१.२०२४ रोजी कलम ३७६ अ, ब २एन,३७७,५०६ अट्रोसिटी ३(१), डब्लू,३(२), तसेच बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ४,६ अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून श्री जगदंबा गोलाई मंदिर ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य रस्त्यावर मोर्चात सामील झालेल्या बांधवासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या मोर्चामध्ये लातूर शहरासह जिल्ह्यातून अनेक लोक सामील झाले होते. प्रत्येकाचे हातात मागण्याचे फलक होते. लहान मुलांपासून वयोवृद्ध ते अपंगापर्यंत सर्वांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या मोर्चाचे कोणीही नेतृत्व केले नाही. कोणाचेही नेतृत्व नसताना प्रत्येकाने स्वतःच्या इच्छेने आपला सहभाग नोंदवला. तसेच अनेक स्वयंसेवकांनी चांगले काम केले. ज्यामध्ये प्रत्येकाला शिस्तीत चालण्यास सांगणे, शांतता बाळगण्यास सांगणे यासह वाहतुकीला शिस्त लावणे असे अनेक महत्वाचे काम या स्वयंसेवकांनी केल्यामुळे प्रशासनाचा मोठा कामाचा ताण वाचला. मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचल्यावर मुली व महिलांनी प्रशासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. या मोर्चामध्ये शहरातील अनेक राजकीय पक्षाच्या लोक प्रतिनिधीनी आपली हजेरी लावली होती. पोलीस प्रशासनाकडून ही अगदी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात स्वतः पोलीस अधीक्षक सोमय मुंडे विशेष लक्ष देऊन होते. त्यांच्यासह १ अप्पर पोलीस अधीक्षक, १ पोलीस उपाधीक्षक, ५ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक व महिला पोलीस अंमलदार अधिकारी, पोलीस अंमलदार, वाहतूक पोलीस या सुरक्षा यंत्रणे मध्ये सहभाग नोंदविला. शहरातील सर्व रस्त्यावर पोलीस बंदोबस्त चोख होता. कोठेही या मोर्चाला गालबोट लागेल किंवा तणावाची स्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. या मोर्चाची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.
या मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले
वलांडी अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा करावी, पिडीत कुटुंबात वयोवृध्द आजाराने ग्रस्त सासु, सासरे, एक विधवा महीला व त्यांच्या ४ लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे, जी मोलमजुरी करून उदनिर्वाह भागविते. पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे, पिडीत कुटुंबियास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी, पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा, सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (स्पेशल केस खाली) मदत देण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबियांना गाव बंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी.