लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला जाळ्यात

2 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत

औसा : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणारा पशुधन विकास अधिकारी व त्याचा साथीदार जाळ्यात अडकला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २७) औसा पंचायत समितीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ही कारवाई केली आहे. हिरालाल गणपतराव निंबाळकर (५७, रा.निलंगा) असे लाचखोर पशुधन विकास अधिकारी तर उंबडगाव (बु.) ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक माधव संग्राम येवतीकर (२९, रा. औसा) असे दोघा लाचखोरांचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावे औसा तालुक्यातील मौजे सत्तधरवाडी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पशुधन गोठ्याचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व त्याचे पैसे मंजूर करण्यासाठी औसा येथील पशुधन विस्तार अधिकारी कार्यालय (विस्तार) येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) हिरालाल गणपतराव निंबाळकर याने १ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. यामध्ये पशुधन विकास अधिकारी निंबाळकर यांनी लाचेची रक्कम संगणक परिचालक माधव येवतीकर याच्याकडे देण्यास सांगितली. औसा पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताच संगणक परिचालक माधव येवतीकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. तसेच पशुधन अधिकारी निंबाळकर यांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ताब्यात घेण्यात आलेे. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संतोष बर्गे करीत आहेत.

ही कारवाई लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोलीस हवलदार फारूक दामटे, भागवत कठारे, शाम गिरी, भीमराव आलुरे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, दीपक कलवले, गजानन जाधव, संतोष क्षीरसागर यांनी केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन 

शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी नांदेड परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (भ्रमणध्वनी क्र. 09623999944), लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे (भ्रमणध्वनी क्र. 07744812535) यांच्याशी अथवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 02482-242674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!