भाजपच्या पक्ष निरीक्षकांकडून लातूर लोकसभा उमेदवारांची चाचपणी: शृंगारे, काथवटे, भालेराव अन् रांजणकरांची नावे चर्चेत

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने ४५+ जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी रणनीती आखली आहे. अनेक जागांवर बदल करण्याची तयारीही झाली आहे. भाजपाने लातूर लोकसभेसाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पक्ष निरीक्षक म्हणून पाठविले होते. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षकांकडून जवळपास १३२ पदाधिका-यांच्या मुलाखती घेवून पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पक्षनिरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्वच, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वन टू वन मुलाखती घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पक्ष निरीक्षकांकडून इच्छुक पदाधिका-यांच्या मुलाखती घेवून उमेदवारीसाठी कोण योग्य आहे, याची चाचपणी केली. यावेळी पक्षश्रेष्ठींकडे बंद लिफाफ्यात मते पाठविल्याचे सांगण्यात आले. लोकसभा मतदारसंघांत पाठविलेल्या निरीक्षकांकडून प्रमुख नेत्यांशी चर्चा करताना उमेदवार कोण असावा, जमेच्या बाजू, कमकवूत बाजू अशी माहिती घेण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ना. सावे, आ. कल्याणशेट्टी यांनी सर्वांशी चर्चा केली. दरम्यान, विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे, अॅड.दिग्विजय काथवटे, माजी आमदार सुधाकर भालेराव, श्रीकांत रांजणकर यांच्या नावांची चर्चा आहे. शासकीय विश्रामगृहावर याप्रसंगी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन देखील पहावयास मिळाले. परंतु याकडे पक्ष निरीक्षकांनी पुर्णतः कानाडोळा केल्याचे दिसून आले.

प्रकाशझोतात येण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. लातूरकरांना कधीही न दिसणारे नेतेमंडळी आता सुख-दुःखाच्या प्रसंगात आवर्जून हजेरी लावत आहेत. साखरपुडा आणि लग्न सोहळ्यास नेतेमंडळींची गर्दी वाढली आहे. लग्नाचा मुहूर्त चुकला, तरी लग्न सोहळ्यास हजेरी लावण्याकडे कल वाढला आहे. दशक्रिया विधीसाठी गर्दी वाढली आहे. एरवी कोणाचे निधन झाले, याकडे लक्ष न देणारे नेते सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घराचा उंबरा चढत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत.

मतदारसंघातील समस्या

एकंदरीत या मतदारसंघांच्या समस्यावर जर नजर टाकली तर या मतदार संघात सगळ्यात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात तर या मतदारसंघातील अनेक गावं ही पाण्यासाठी दाहीदिशा एक करताना पाहायला मिळतात.
यासोबतच तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठा उद्योग जिल्ह्यात येणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न कायम आहे. विद्यापीठाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. सोयाबीन, टोमॅटो उत्पादन जिल्ह्यात मोठया प्रमाणात होते या उद्योगासाठी केंद्रातून जिल्ह्यात मोठा निधी येणे आवश्यक आहे असे अनेक प्रश्न मागण्या नागरिकांतून चर्चील्या जात आहेत. अशा विविध समस्याची जाण असणारा उमेदवार आवश्यक आहे.

स्थानिकसह आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असणारा उमेदवार हवा

लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला स्थानिक, देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत. त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांचीही त्यास जाण असावी, अशी चर्चा जनतेतून होत आहे.

मतदारसंघात वास्तव्य करणारा उमेदवार हवा

 निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी मुंबई दिल्लीत वास्तव्य करतात व कामानिमित्त मतदार संघात येत असतात याउलट मतदारसंघात वास्तव्य करणारा कामानिमित्त मुंबई दिल्लीला जाणारा उमेदवार पक्षाने द्यावा अशी मागणी समोर येत आहे.

हे आहेत भाजपाकडून इच्छुक उमेदवार

सध्या लातूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे, माजी आ. सुधाकर भालेराव, भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, नामदेव कदम, इंजि. विश्वजित गायकवाड, गोरक्षक श्रीकांत रांजणकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!