लातूर लोकसभेसाठी भाजपकडून डॉ.अनिल कांबळे यांच्या नावाची शक्यता ; भाजपा मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देणार?

4 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणाला जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती असताना प्रत्येक राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, मतदारसंघाची चाचपणी करताना दिसत आहेत. त्यातच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुका अतिशय गांभीर्याने लढविणारी भाजपा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे जुळवून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते, त्यामुळे लातूरच्या राखीव लोकसभा मतदारसंघात यावेळेला उच्च विद्याविभूषित व सामाजिक भान असलेले पक्षनिष्ठेने गेली अनेक वर्षे राजकिय क्षेत्रात काम करीत असलेले डॉ. अनिल कांबळे यांची दावेदारी पक्की मानली जात आहे. व गेल्या तीन टर्मपासून वंचित असलेल्या मातंग समाजाला प्रतिनिधित्व देईल अशी शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहेत.

         लातूर राखीव लोकसभा मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत रोज नव्या चर्चा होत आहेत. दररोज नवीन नावे समोर येत आहेत. उमेदवारी कोणाला जाहीर होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लातूर लोकसभा हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव मतदारसंघ आहे. राजकीय दृष्ट्या उपेक्षित किंवा कमकुवत असलेल्या समूहाला राजकीय आणि सामाजिक प्रवाहात आणून त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठीचा हा मतदारसंघ.

लातूर जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत क्रमांक दोनवर असलेल्या मातंग समाजाला २००९, २०१४ व २०१९ सालापर्यंत लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून एकदाही उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन राजकारण करणारा भाजप गेली तीन टर्म संधीच्या प्रतीक्षेत असलेला मातंग समाजाला यावेळी लातूर लोकसभेसाठी प्रतिनिधित्व देऊ शकतो, व तशी मागणीही समाजाच्या वतीने होताना दिसत आहे. याची दखल भाजप नक्कीच घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अगोदरच मातंग समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मागासलेला आहे. या मागासलेल्या समाजाचा सर्व क्षेत्रात विकासात्मक दर्जा उंचावण्याकरिता लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदगीर जळकोट मतदार संघातून नंबर दोनवर राहिलेले भाजपाचे डॉ. अनिल कांबळे यांची पक्षाशी व मतदारांशी एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. शिवाय ते उच्चशिक्षित डॉक्टर आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी भाजपाचे आजपर्यंत कार्य केलेले आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत ते नेहमीच मदत करताना दिसतात. संपूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. यापूर्वी तत्कालीन राखीव लातूर व उस्मानाबाद मतदार संघात सर्वाधिक काळ उदगीरकरांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. उच्चशिक्षित असलेले डॉ.अनिल कांबळे यांच्या माध्यमातुन भाजपाने उदगीरकरांना संधी दिल्यास ते या संधीच नक्कीच सोनं करतील आणि केंद्रातून विकास निधी आणून लातूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलतील अशा चर्चा उदगीरकरांतून व्यक्त होत आहेत.

       देशात सध्या १७ व्या लोकसभेचा कालावधी संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक अगदी कांही दिवसांत जाहीर होऊ शकतात. राज्यातील ४८ जागांसाठी मार्च , एप्रिल महिण्यात विविध टप्प्यांत मतदान होतील असा कयास बांधला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अबकी बार 400 पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने 45 + जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी रणनीती आखली आहे. अनेक जागांवर बदल करण्याची तयारीही झाली आहे. महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात कसे होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला ३२ – १२ – ४ या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील. तर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. तेंव्हा लातूर लोकसभेसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक असले तरी, भाजप जातीय समीकरण जुळवून योग्य तो उमेदवार देईल असा अंदाज बांधला जात असला तरी, डॉ.अनिल कांबळे हे भाजपकडून योग्य उमेदवार ठरू शकतात असा मतप्रवाह सध्या लातूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. काही दिवसांतच हे चित्र देखील स्पष्ट होईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!