लातूर जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराचा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

3 Min Read

|मुखपत्र दक्षता वृत्तांत 
लातूर : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला जिल्हा रूग्णालयाचा प्रश्‍न गत १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी माझं लातूर परिवाराने आता आक्रमक भूमिका घेतली असून जोपर्यंत जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आगामी लोकसभा निवडणूक आणि नंतरच्या कोणत्याही निवडणुक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे शासनाचे कर्तव्य आहे मात्र या मुलभूत सेवेपासून लातूर जिल्ह्याची सर्वसामान्य जनता एका तपापेक्षा अधिक काळापासून वंचित आहे. लातूरकरांच्या या प्रमुख मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माझं लातूर परिवाराने २ ऑक्टोंबर २०२३ रोजी शहरातील गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दिपक सुळ, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, विविध सामजिक संघटना, संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. या उपोषणाची दखल घेत शासन दरबारी हा प्रश्‍न एका महिन्यात सोडविण्याचे आश्‍वासन जिल्हा प्रशासन आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यु पवार यांनी उपोषणस्थळी येऊन दिले होते तेंव्हा माझं लातूर परिवाराने हे साखळी उपोषण ६ व्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईत मंत्रालयात जावून माझं लातूरचे शिष्टमंडळ आरोग्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, उद्योगमंत्री तसेच जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींची भेट घेत निवेदन सादर करून हा प्रश्‍न सोडवण्यासाठी साकडे घातले. मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून पत्र व्यवहारही सुरू केला. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अनेकदा भेटून पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती. सलग ५ महिने पाठपुरावा करून देखील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि मुलभूत प्रश्नावर शासन गंभीर नाही असेच यातून स्पष्ट होत आहे. शासनाच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी आता माझं लातूर आक्रमक झाले असून जोपर्यंत जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आगामी लोकसभा, तसेच यापुढील सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावून त्वरित भूमिपूजन करावे अशी विनंती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व सुज्ञ मतदारांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा यासाठी लवकरच जिल्हाभरात मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे माझं लातूर परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!