लातूरची राजकीय संस्कृती व्यापकतेकडून संकुचिततेकडे? भर बैठकीत गुरुनाथ मगे, देविदास काळेंमधील वाद हातघाईवर

3 Min Read

लिंगायत समाज दखल घेणार? प्रदेश कार्यकारणीकडून कडक कारवाई होणार?

लातूर / प्रतिनिधी : देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच निवडणूक मार्गात भाजपात काट्यांची पेरणी सुरू आहे. शासकीय विश्रामगृह येथे भाजप शहराची बैठक सुरू असताना पक्षाचे माजी अध्यक्ष तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघ प्रमुख गुरुनाथ मगे यांना विद्यमान भाजप अध्यक्ष देविदास काळे यांच्यात शाब्दिक चकमक उडत हा वाद इतका विकोपाला पोहचला की तो थेट हातघाईवर आल्याने भाजप व लातूरच्या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया लातूरकरांमधून उमटत आहे.

          याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा थेट इंडिया आघाडी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी करीत आहे. परंतु लातूर भाजपात वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्या बैठकीला शहर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते, पक्षाचे प्रदेश पदाधिकारी किरण पाटील आणि संजय कौडगे हे उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार बैठक सुरू होताच माजी अध्यक्ष आणि विद्यमान विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे यांनी विधानसभा समित्या नियुक्त केल्या आहेत त्या नावाची घोषणा करावी असे सांगत नावाचा कागद संजय कौडगे यांच्यांकडे दिला असता याला विरोध दर्शवित भाजप अध्यक्ष देविदास काळे यांनी तो कागद हिसकावून घेत यात जी नावे आहेत त्यांचा पक्षाचा कांहीही संबंध नसल्याची भूमिका मांडली. यामुळे हा वाद चिघळला व याची परिणती हातघाईपर्यंत गेली. गुरुनाथ मगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देविदास काळे यांची तक्रार केली होती त्याच पार्श्वभूमीवर माझी तक्रार करतोस का म्हणून पक्षाचे निरीक्षक किरण पाटील आणि प्रभारी संजय कौडगे यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाच्या पदाधिकाऱ्याला अशी वागणूक दिल्याने लिंगायत समाजातील कांही प्रतिष्ठित व्यक्तींनी हे लिंगायत समाजासाठी अपमानित करणारी घटना असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळे लातुरात बहुसंख्येतील लिंगायत समाजाची नाराजी ओढवून घेणे भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे या घटनेसंदर्भात प्रदेश पातळीवर भाजप काय कारवाई करणार याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

लिंगायत समाजाची निषेध बैठक 

लातूर जिल्ह्यातील राजकारण हा नेहमीच राज्यपातळीवर चर्चेचा विषय राहिला आहे. लातूर राजकीय दृष्ट्या सक्षमच राहिले आहे. त्यात स्वातंत्र्यानंतर तर देविसिंह चौहान, केशवराव सोनवणे, शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख असे नेते जिल्ह्याला मिळाले. दिवंगत निलंगेकर व विलासराव देशमुख यांच्या रुपाने तर लातूरला मुख्यमंत्री पदही मिळाले. तर चाकूरकर यांच्या रुपाने लोकसभेचे सभापतीपद व गृहमंत्री पद देखील लातूरला मिळाले. त्यानंतर दिलीपराव देशमुख, बाळासाहेब जाधव, अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, संजय बनसोडे आदींनी मंत्रीपदेही भूषवली. परंतु आतापर्यंत टोकाचे किंवा गालबोट लागेल अशा घटना कधीच घडल्या नाहीत. शासकीय विश्रामगृहावर घडलेल्या घटनेबाबत लिंगायत समाजाच्या वतीने आज सायंकाळी शहरात निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!