अहिंसेचे प्रतीक भगवान महावीर आणि जैन धर्म 

3 Min Read

जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर, अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक भगवान महावीर यांची आज जयंती. ज्या आंतरिक गुणांच्या सामर्थ्यावर महावीरांनी नैतिक धारणा व व्यावहारिक जीवन यांचा समतोल घडवून आणला त्याला आजही तोड नाही, ही बाब अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे भारतामध्ये व लोकजीवनामध्ये सामाजिक अखंडत्व राहिले. महावीर जयंतीच्या निमित्ताने…

गवान महावीरांचा निर्वाणकाळ होऊन २५४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर तर महावीर जैनांचे चोविसावे तीर्थंकर. भगवान महावीरांच्या किमान दोन हजार वर्षे आधी त्यांचा कालावधी आहे, असे म्हटले जाते. जैन धर्मात आत्म्याला स्थान आहे. स्वतः शुद्ध रहा तरच इतरांना (सर्व प्रकारच्या) शुद्धतेचा धडा मिळतो आणि समाज सुखाने नांदतो, हे त्रिवार असलेले सत्य जैनांचे उगमस्थान आहे. हा धर्म आपल्या विचारप्रणालीच्या व जीवन पद्धतीच्या विकास कार्यात कोणत्याही संकुचित दृष्टीला कधीही बळी पडला नाही. त्याची भूमिका राष्ट्रीय दृष्टीने नेहमीच उदार व उदात्त राहिली आहे.

प्राग्वैदिक काळातील हा धर्म मानवाच्या कल्याणासाठी पुढे अत्यंत विकसित रूप घेऊन आला. श्रमण जैन हे मोठे आत्मसमाधानी, परदुःखहारी, दयाळू, समस्त जीवांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणारे, शांत, इंद्रियजयी, त्यागी आणि कोणताही अभिनिवेश धारण न करणारे व आत्मकल्याणाची कास धरणारे होते व आहेत. आजही त्यापैकी काही गुण प्रकर्षाने दिसून येतात. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ‘इंडियन फिलॉसॉफी’ च्या पहिल्या खंडात, जैन परंपरा ऋषभदेवापासून निर्माण झाल्याचे केलेले कथन योग्यच आहे. महावीर जैन यांनी धर्माला तत्त्वज्ञानाचा साज चढवून सुसूत्रीकरण केले. जीव आणि आजीव ही विश्वातील दोन मूलतत्त्वे असून, ते परस्पर संबधित आहेत. जीवाच्या मन, वचन, कायात्म क्रियेमुळे जीव-आजीवाचा संबंध परंपरेने चालू राहतो. यालाच ‘कर्मस्रव’ व ‘कर्मबंध’ म्हणतात. यम नियमादिक पालनामुळे कर्मास्त्रवाची परंपरा रोखणे शक्य होते तसेच संयम आणि तपाने पूर्वीचा कर्मबंध नष्ट करणेही शक्य होते. अशा रीतीने जीवाला जडबंधापासून सर्व प्रकारे मुक्त करून आपल्या अनंत ज्ञानदर्शनात्मक आंतरिक स्वरूपाची प्राप्ती करून घेणे, हेच जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. यामुळे जन्म-मृत्यूची परंपरा नष्ट होऊन निर्वाणाची प्राप्ती होते. समग्र जैन तत्त्वज्ञानाचा हा संक्षेप आपण लक्षात ठेवला पाहिजे.

जैन समाजाची ही स्वतंत्र विचारसरणी जीवन पद्धतीच्या विकास कार्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्याशिवाय जैन पद्धतीचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याची राष्ट्रीय वृत्ती! उदार व उदात्त दृष्टिकोनातून या समाजाने या राष्ट्रीय वृत्तीची जोपासना केल्याचे दिसून येते. भारतात किंवा विदेशात हा समाज राष्ट्रीय वृत्तीपासून कधीच दूर राहिला नाही. कोणत्याही एकाच भागासंबंधीचा अभिनिवेश जैन समाजाने कधीच निर्माण केला नाही. ओडिसा, बिहारमधील जैन समाज असू दे किंवा आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्रातला असू दे. आपल्या अखंडत्वाची जोपासना व संवर्धन करण्यात या समाजाने मोठी निर्धाराची भूमिका निभावलेली दिसून येईल. धर्मप्रचारासाठी किंवा आत्मरक्षणासाठी श्रमण संस्कृतीचे लोक आपल्या देशाच्या बाहेर कधी गेले नाहीत. म्हणूनच प्रांतीयतेची संकुचित भावना जैनांनी कोठेही बाळगू दिली नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!