» मुखपत्र दक्षता वृत्तांत
कोल्हापूर / प्रतिनिधी : रेस्टॉरंटची तपासणी केल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने एक लाख रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 70 हजार रुपये लाचेची मागणी करून त्याचा पहिला हफ्ता 25 हजार रुपये लाच स्वतः स्वीकारताना श्रीमती किर्ती देशमुख या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी आलोसे किर्ती देशमुख यांच्या ताराबाई पार्क चौक कोल्हापूर स्थित घराच्या पार्किंगमध्ये करण्यात आली. यामुळे परिसरात एकच हडकंप उडाला. माहितीनुसार, तक्रारदाराचे किणी ता.हातकणगंले येथे रेस्टॉरंट आहे. दि.15 मार्च 2024 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती किर्ती देशमुख ह्या तपासणीसाठी तक्रारदार यांच्याकडे आले होते. नमूद रेस्टोरेंटवर तपासणी करून अन्न पदार्थांचे नमुने घेतले व तक्रारदार यांना सदरबाबत कोणतीही कारवाई न करणेसाठी तक्रारदार यांना एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती सत्तर हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहीला हफ्ता पंचवीस हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारले वरुन त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये रंगेहात पकडण्यात येवून त्यांच्या विरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे, यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बंबरगेकर, सफौ भंडारे, पोलीस अंमलदार सुधीर पाटील, महिला पोलीस अंमलदार पूनम पाटील सर्व नेम ला.प्र.वि. सोलापूर यांनी केली.