»मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : लातूर लोकसभा मतदारसंघात फायर बँड, हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजिण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. योगींची सभा मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात ३ किंवा ४ मे रोजी होईल असा दावा करण्यात येत असला, तरी लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अहमदपूर किंवा उदगीर येथे सभेच्या नियोजनासाठी भाजपा आग्रही आहे.
‘लातूर’मध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसमधील फुटीनंतर आ.अमित देशमुख आणि भाजपाचे आ.संभाजी पाटील निलंगेकर या दोन्ही माजी पालकमंत्र्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली असून, सध्या या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. गेल्या दोन टर्मपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या लातूर लोकसभा या काँग्रेसच्या बालेकिल्यात हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदींच्या सभेनंतर योगींची सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नरेंद्र मोदींनंतर स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांची सभा, रॅली व्हावी, यासाठी लातूर येथील महायुतीच्या उमेदवारांने पक्षश्रेष्ठींना साकडे घातले असल्याचे बोलले जात आहे.