१० वीनंतर कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम

3 Min Read

ऱ्याच पालकांना १० वीनंतरच मुलांच्या करिअरचा मार्ग स्पष्ट व्हावा असे वाटत असते. १० वीनंतरच करिअरच्या दिशा बऱ्यापैकी निश्चित होऊ शकतात असेही वाटते. त्यात काहीही वावगे नाही. मानवाच्या जीवनातील खरा दागिना म्हणजे छंद आहे, असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. मानवाला सर्वांत जास्त सुख, समाधान आणि आनंद जर कोणत्या गोष्टीमुळे मिळत असेल, तर तो म्हणजे छंद. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या आवडीचा एखादा तरी छंद जोपासत असतो. त्यांना जे आवडते, तीच आवड, तोच छंद जर त्यांच्या करिअरशी जोडला गेला, तर अधिक अनुरूप होईल. त्या क्षेत्रात ते अधिक ऊर्जेने व हिरारीने काम करू शकतील.

१० वीनंतर मुलांचा सर्वसाधारण कल, छंद, आवड याची बऱ्यापैकी कल्पना आल्यास व त्याच्यातील कला आणि कौशल्य याबाबत पालक आणि मुलांच्या मनात कोणताही गोंधळ नसल्यास मुलांनी १० तीनंतर आपला मार्ग निवडायला हरकत नाही, विशेषतः कला, कौशल्य विषयात रस आणि गती असल्याचे लक्षात आल्यास अशा विद्यार्थ्यानी कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम करायला हरकत नाही. १० वीनंतर असे ठामपणे पालकांना व विद्यार्थ्यांना वाटल्यास वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मधून करता येऊ शकतात. राज्यात आयटीआयचे मोठे आणि सक्षम असे जाळे आहे. १० वीचा निकाल लागला की लगेच दुसऱ्या दिवशीपासून आयटीआयची प्रवेश प्रकिया सुरू होते. दहावीत मिळालेल्या गुणांवर आधारित हे प्रवेश दिले जातात. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन आहे. विद्यार्थ्याचा कल कोणत्या विषयाकडे आहे, हे लक्षात घेऊन पालकांनी ट्रेडची निवड करायला हवी. हे ट्रेड आपल्या जवळच्या तालुक्यातील आयटीआयमध्ये आहेत का? याची प्रत्यक्ष खातरजमा करायला हवी, १० वीचा निकाल लागण्यापूर्वीच्या कालावधीत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये एक आणि दोन वर्षाचे वेगवेगळ्या व्यवसायाचे (ट्रेड) प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण विद्यार्थ्याने रोजगार आणि स्वंयरोजगारासाठी सक्षम व्हावे या दृष्टीने दिले जाते. प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशीप) योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष कारखान्यात किंवा एखाद्या उद्योगात कसे काम चालते याचे प्रशिक्षण मिळते. आयटीआय केलेला विद्यार्थी सहसा रिकामा राहत नाही. आयटीआयमधील प्रशिक्षणामुळे जे कौशल्य या विद्यार्थ्यांने प्राप्त केले असते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढलेला असतो, आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांने त्याच्या ट्रेडमध्ये चांगलीच तज्ज्ञता मिळवली तर तो भविष्यात स्वःताचा लघु उद्योगही सक्षमरीत्या सुरू करू शकतो. भारत आणि जपान व जर्मनी या देशासोबत झालेल्या सामंजस करार अंतर्गत इंडो जपान या संस्थांतर्गत विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी करायची संधी प्राप्त होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!