» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : शेतामध्ये विहिरीच्या पंपाकरीता नवीन वीज कनेक्शन जोडणी करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. सतिश उत्तमराव कांबळे, वय ३८ वर्षे, पद तंत्रज्ञ, वर्ग-३, नेमणूक महावितरण कार्यालय, शाखा बेलकुंड, ता.औसा, जि.लातूर, रा.हंगरगा ता.निलंगा जि.लातूर, ह.मु. बँक कॉलनी रोड, आनंद नगर, निलंगा, जि. लातूर असे लाच घेणाऱ्या तंत्रज्ञाचे नाव आहे.
तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांचे नावे मौजे औसा, जि.लातूर येथे सर्वे नंबर ३४७-अ-२ मधील १.२५ हेक्टर शेत जमिनीमध्ये विहिरीचे पंपाकरिता नवीन वीज जोडणी कनेक्शनसाठी अर्ज केलेला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने यातील लोकसेवक सतिश कांबळे यांनी तक्रारदार यांचे वीज जोडणीचे काम करून देण्यासाठी दि.१ डिसेंबर २०२३ रोजी १३ हजार रुपये व दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी २ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये ऑनलाईन फोनपे द्वारे घेतले होते. तक्रारदार यांनी वारंवार लोकसेवक यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांचे काम झाले नाही. तक्रारदार यांनी तंत्रज्ञ कांबळे यांना नवीन वीज कनेक्शन जोडणी द्या, अशी विनंती केली असता. या कामासाठी तीन हजार रुपये लागतील, अशी कांबळे यांनी लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला या प्रकाराची माहिती दिली. आलोसे कांबळे याने तडजोडीअंती २ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम तुळजापूर टी-पॉईंट, औसा जवळील शिंदे स्पेशल राईस सेंटर समोर शासकीय पंचासमक्ष स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून आलोसे कांबळे याला लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आलोसे कांबळे यांच्याविरुद्ध औसा पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्या पथकाने केली.