» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : पोलीस ठाण्यात दाखल होणारे सर्व गुन्हे, आरोपी यांसह सर्व कामकाजाची माहिती संगणकीय यंत्रणेत भरून ती जतन करण्यासाठी २०१५ पासून सीसीटीएनएस ही यंत्रणा देशपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या कामकाजासंदर्भात करण्यात आलेल्या मूल्यमापनात एप्रिल २०२४ मध्ये कासार शिरसी पोलीस प्रथम क्रमांकावर राहिले.
जिल्हाभरातील पोलिसांकडून चालणारे सीसीटीएनएस कामकाजाचे जिल्हा पोलीस दलाकडून दरमहा परीक्षण केले जाते. एप्रिल २०२४ या महिन्याच्या मूल्यमापनात कासार शिरसी पोलीसांनी सीसीटीएनएस मधील मूल्यांकनात प्रथम येण्याचा मान दुसऱ्यांदा मिळवला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी कासार शिरसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रियाज शेख व पोलीस अंमलदार बालाजी बन यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
कासार शिरसी पोलीस स्टेशनला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल निलंगा पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कासार शिरसी पोलीस स्टेशनकडून मागील कालावधीत उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने बऱ्याच वेळा उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई, उत्कृष्ट समन्स बजावणी, उत्कृष्ट वॉरंट बजावणी, सीसीटीएनएस डेटा फिडिंग इत्यादी बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.