गडहिंग्लज पोलिसांचा पुढाकार; तब्बल ६७० रक्तदात्यांचे रक्तदान 

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

गडहिंग्लज / प्रतिनिधी : रुग्णांना रक्ताची गरज लक्षात घेऊन गडहिंग्लज पोलिस व वैभवलक्ष्मी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान करण्याचे आवाहन करताच ६७० रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

गडहिंग्लज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले गडहिंग्लजला रुजू झाल्यापासून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कायदा व सुव्यवस्था राखत त्यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी दाखवत नागरिकांना नेहमीच मदत होत असते. सध्या कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे जाहीर केले होते. गडहिंग्लज पोलिस व वैभवलक्ष्मी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर बचत भवन कार्यालय येथे पार पडले. या शिबिरात गडहिंग्लज व परिसरातील एकूण ६७० नागरिक, पोलिस व पोलीस पाटील यांनी रक्तदान केले. यावेळी सर्व रक्तदात्याना हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर रक्तदान शिबिरास परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे श्रेयश जुवेकर, अनमोल कामत व त्यांचा स्टाफ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.संगिता खांडेकर, गडहिंग्लज उपविभागीय कार्यालय व गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. रक्ताचा तुटवडा ओळखत रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेत गडहिंग्लज पोलिसांनी सामाजिक कर्तव्याचा परिचय करून दिला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!