सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनो आयटी उद्योग लातूरला आणा ; आयटी उद्योगामुळे लातूरचा बदलेल चेहरामोहरा

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूरच्या विधायकतेची ओढ सर्वांनाच आहे. राज्यात सर्वात शांत जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. राज्यात शिक्षण, शेती व व्यापार-उद्योग या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती केलेले फार कमी जिल्हे आहेत. यामध्ये आपल्याला लातूरचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालयांनी गेली चार दशक कठोर मेहनत घेतली त्यामुळे संपूर्ण देशभरात डॉक्टर व इंजिनीयर फॅक्टरी म्हणून लातूरची ओळख आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये अनेक बदल झाले तरी लातूरने शिक्षणातील आपली गुणवत्ता कायम राखली. आजमितीला लातूरच्या विकासात भरीव योगदान देणारे लातूरचे भूमिपुत्र लोकनेते स्व.विलासराव देशमुख, स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले आहे तर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर वयोमानानुसार राजकारणात सक्रिय नाहीत. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्याच्या विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेल्या लातूरने विकासाच्या दिशेने अतिशय वेगाने वाटचाल केली परंतु आज त्याच लातुरातील विकास गेल्या कांही वर्षात कुठे हरवलाय हेच समजत नाही. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील आयटीपार्क उद्योग महाराष्ट्राच्याबाहेर स्थलांतर होण्यापूर्वी ते लातूरला आणण्यासाठी राज्याचे विद्यमान मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, राज्याचे माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. देशातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे. पुणे शहराला येथील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे “पूर्वेकडील ऑक्सफर्ड” म्हणून संबोधले जाते त्यामुळे एक विकसनशील शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे परंतु अलिकडच्या काळात ट्रॅफिक जामच्या कारणांनी हिंजवडी आयटी पार्कमधील ३७ मोठ्या कंपन्या राज्याबाहेर स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने तीन दिवसांपूर्वी दिली. दरम्यान, लातूर हा आयटीपार्कसाठी महामार्ग, विमानतळ, रेल्वेसह भौगोलिक रचनेत अधिक पूरक आहे. याबाबत तज्ञांकडून दाखले मिळू लागले आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या जिल्ह्यात आयटीपार्कसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करुन हिंजवडीतील आयटीपार्क लातूरला आणावे, अशी मागणी पदवीधर युवकांमधून होत आहे. हिंजवडी येथील कांही कंपन्या आजमितीस पायाभूत सुविधांअभावी इतरत्र स्थलांतराचा विचार करत आहेत. याच संधीचा फायदा लातूर जिल्ह्यातील सर्वच कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींनी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. लातूर येथील भौगोलिक स्थिती इतर जिल्ह्याच्या तुलनेत योग्य आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश एमआयडीसीतील उद्योग आजमितीस बंद आहेत. त्यामुळे त्या जागेचा राज्याचे विद्यमान मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, राज्याचे माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारणातील आपापसातील मतभेद विसरुन यासाठी सामुहिक प्रयत्न करुन आयटीपार्कचे काम गतीमान करावे. आयटी कंपन्या लातूरला आल्यास लातूरचे नाव जगाच्या नकाशावर जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!