भोसरी विधानसभेत महायुतीची मोठी ताकद असताना चुकले कुठे? (भाग १)

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

भोसरी / आर.एम.कांबळे : मतमोजणीनंतर शिरूर लोकसभेच्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटलांना धूळ चारली आहे. निकाल जाहीर होताच कोणत्या उमेदवाराने कोणत्या विधानसभा क्षेत्रात आघाडी घेतली याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. कारण आगामी विधानसभा निवडणुकीची समिकरणे या निकालावरून जुळवली जाणार आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी सहा विधानसभा मतदारसंघ येतात. लोकसभा निवडणुकीच्याआधी महायुतीच्या फॉर्मुल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडे शिरूरची जागा गेल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील शिवाजीराव आढळराव -पाटीलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी दाखल केली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातील समोर आलेल्या आकडेवारीनंतर भोसरीतील भाजप नेत्यांचे धाबे दणाणले असून आगामी विधानसभा महायुतीसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. १ लाख २७ हजार ३९५ इतकी मते शिवाजीराव आढळराव पाटील यांना तर १ लाख १७ हजार ८२३ मते डॉ. अमोल कोल्हेना पडली आहेत. यात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांना भोसरी विधानसभा मतदारसंघाने साथ देत ९ हजार ५७२ इतके मताधिक्य दिले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभेत महायुतीची मोठी ताकद आहे. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सर्व माजी नगरसेवक हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत असताना आढळरावांचे मागील लोकसभेच्या तुलनेत मताधिक्य घटले कुठे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या निकालांत ज्यामध्ये सत्ताधारी महायुतीचा उमेदवार भोसरी विधानसभा मतदारसंघातून फक्त साडे नऊ हजाराची लीड राखण्यात यशस्वी ठरला, लोकसभेचा निकाल जाहीर होताच आता विधानसभेचे वादळ घोंगावू लागले आहे. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विधान सभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोसरीतील भाजप उमेदवार बदलणार? लोकसभेत मताधिक्य घटल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा वाजली तर नाही, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!