२३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासह देशाच्या आरोग्य विभागाचे भविष्य अंधारात? एनटीएची कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात? परीक्षेत अनियमितता होणे सामान्य बाब बनली?

3 Min Read
पुन्हा नीटची परीक्षा घ्या, या व अन्य मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
(पुन्हा नीटची परीक्षा घ्या, व अन्य मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.)

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट परीक्षा ५ मे २०२४ रोजी घेण्यात आली. परीक्षांच्या अवघ्या कांही दिवसात विविध राज्याच्या उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला नसल्याची याचिका दाखल केली. याप्रकरणी एनटीएच्या तक्रार निवारण समिती (जीआरसी) च्या निष्कर्षातून एनटीएकडून १,५६३ विद्यार्थ्यांना वाढीव गुण (ग्रेस मार्क्स) देण्यात आले. परंतु वाढीव गुण (ग्रेस मार्क) मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी नीट-यूजी ऑल-इंडिया टॉपर्स ठरले. नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांकडून नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर देशातील कांही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणाची सुरुवात वाढीव गुणातून (ग्रेस मार्क) झाली. सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून वाढीव गुण (ग्रेस मार्क) देण्यात कसलीच चूक झाली नाही, असा दावा करण्यात आला परंतु सर्वोच्च न्यायालयात उत्तर देतांना एनटीएने म्हटले की, वाढीव गुणा (ग्रेस मार्क) मुळे शंका वाढली आहे. त्यामुळे वाढीव गुण (ग्रेस मार्क) मिळालेल्या विद्यार्थ्यांना परत एकदा २३ जून रोजी परीक्षा द्यावी लागेल. फक्त ६ सेंटर वर चूक झाली मात्र इतर कुठेच कसलीच चूक झाली नसल्याचे सांगितले, पण यासर्वात कुठेतरी एनटीएच्या कार्यप्रणालीवर विद्यार्थ्यांतून/ पालकांतून शंका उपस्थित केली जाताना दिसत आहे. ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेवरून सध्या देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नीट परीक्षेतील अनियमिततेच्या अनुषंगाने देशात विरोध प्रदर्शन होताना दिसत आहे. विरोधी पक्षातून ही यावर मोठया प्रमाणात टीका होत आहे.

परीक्षेत अनियमितता होणे सामान्य बाब बनली?

गोष्ट देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांची आहे ज्यांना वाटते की मेहनत करून अभ्यास केल्यानंतर चांगले भविष्य मिळणार आहे. अगोदरच देशात सुरु असलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुण मिळवण्यासाठीची मोठया प्रमाणात स्पर्धा असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाबाबतचा दबाव मोठया प्रमाणात आढळतो. देशात चांगल्या एम्स सारख्या महाविद्यालयाची कमतरता आहे. त्यात विद्यार्थी (सीट्स) संख्येची कमतरता आहे आणि त्यात सीट्स साठी परीक्षा आयोजित केल्या जातात त्यात त्या परीक्षेच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह तयार होत असेल. तर विद्यार्थ्यांनी अपेक्षा कशाची करायची. पेपर फुटी होणे अथवा परीक्षा आयोजनात चुका होणे ही मागील काही वर्षात एक सामान्य बाब बनली आहे.

मी तुम्हाला खात्री देतो की या प्रकरणात जो कोणी दोषी आढळला, मग तो एनटीए असो किंवा एनटीएशी संबंधित कोणताही अधिकारी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी तुम्हाला हे देखील कळवू इच्छितो की सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. जी त्यात आणखी सुधारणा करण्यासाठी शिफारसी देईल.

धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, भारत सरकार

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!