» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे :: कर्नाटकातून बीड जिल्ह्यात निघालेला गुटखा करडखेल-नळेगाव रोडवर उदगीर तालुक्यातील डिग्रसपाटी परिसरात उदगीर ग्रामीण पोलिसांनी रविवारी सायंकाळी पकडला. ३ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त करून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन कारसह तिघांना ताब्यात घेतले आहे. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त खबऱ्यामार्फत कर्नाटक राज्यातून बीड जिल्ह्यात दोन वाहनात गुटखा जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून डिग्रसपाटी परिसरात सापळा लावत कार क्र. एम.एच.०३ बी.सी.१५९८ व कार क्र. एम.एच.१४ सी.एस.८९३४ या दोन पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधील गुटखा उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडला. पोलीस अंमलदार राम विश्वंभर बनसोडे यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रेहमत अली कटुभीया सय्यद, आबेद सालार शेख, फेरोज लतीफ अब्दुल (सर्व रा.परळी, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. उदगीर ग्रामीण पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.