» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला ट्रॅक्टर रविवारी (ता.२३) सापडला. जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या चोरीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने या चोरीतील आरोपी पकडणे आणि ट्रॅक्टर पुन्हा मिळवून देणे हे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, विनोद चिलमे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांचे तपास पथक नेमत तपासाला सुरुवात केली. या गुन्ह्यातील सर्व बाबी तपासत पोलिसांनी संशयित आरोपी सचिन कावळे रा. दापेगाव ता. औसा व त्याच्यासोबत असलेला एक विधीसंघर्ष बालक यास लातूर येथील बाभळगाव चौकातील जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर १ साथीदाराचे साहाय्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. गुन्ह्यात चोरलेला ट्रॅक्टर (अं. किं. साडे सात लाख रुपये) हा पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत. कुठल्याही प्रकारचे धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास व रात्रंदिवस मेहनतीच्या जोरावर आरोपी आणि ट्रॅक्टर मिळवण्यात यश मिळाल्याने जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांचे कौतुक होत आहे.