लातूर / प्रतिनिधी : राज्यात गुटखा बंदी असतानाही परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थी तसेच तरुण पिढीवर दुष्परिणाम होत आहे. त्यावर स्थानिक पोलीस वेळोवेळी कारवाई करत अंकुश लावत असतानाच आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत १४ लाख एक्कावन्न हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागांतून गुटख्याची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांच्या वतीने तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांना शाहू चौक ते अण्णाभाऊ साठे मार्गाने लातूर शहरात जाणाऱ्या एका कारमधून वाहतूक मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वम्भर पल्लेवाड, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, राहुल कांबळे, मनोज खोसे यांच्या पथकाने सदर माहितीवरून एका वाहनातून साडे चार लाख रुपयांचा गुटखा व सिल्वर रंगाची इनोव्हा गाडी (एम. एच. १२ जी.झेड. ०६७९) असा एकूण साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी व्यंकटेश चंदन कोमटवाड वय २४ वर्षे धंदा मजूरी, रा. शाहू चौक, ज्ञानेश्वर नगर, लातूर, २. विशाल शिवाजीराव चव्हाण वय ३७ वर्षे रा. मुरंबी ता. चाकुर जि. लातूर. ३. तानाजी बालाजी खताळ वय ३२ वर्ष रा. बादाडे नगर, तावरजा कॉलनी, लातूर, ४. प्रेम तुकाराम मोरे रा. साळे गल्ली, शाहु चौक, हनुमान मंदीर समोर, लातूर यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.