उत्पन्नापेक्षा ८३ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी बळीराम गणपत चौरे (वय ५६ वर्षे, पद-प्राचार्य, वर्ग-१, नेमणूक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, रा.अवंतीनगर, लातूर ता.जि. लातूर) व त्यांच्या पत्नीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शनिवारी (दि. २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील प्राचार्य पदावर कार्यरत असलेले बळीराम गणपत चौरे (५६) आणि त्यांच्या पत्नी विद्या बळीराम चौरे, (वय ५० वर्ष, व्यवसाय गृहीणी, रा.अवंती नगर, लातुर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लातूर एसीबीचे पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे लातूरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविषयी चर्चा सुरु झाली आहे.

आलोसे बळीराम गणपत चौरे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लातूर एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. चौरे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, चौरे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत उपयुक्त पुरावे ते सादर करु शकले नाहीत. त्यांनी शासकीय पदावर कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ८३ लाख ७१ हजार ०७६ (ज्ञात उत्पन्नापेक्षा ४८.८० टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी बळीराम चौरे यांना त्यांची पत्नी विद्या चौरे यांनी अपप्रेरणा दिली. तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे लातूर एसीबीने दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!