ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्दीच्या बळावर गुणवत्तेचे यशोशिखर गाठू शकतो – प्रा.चिराग सेनमा यांचे प्रतिपादन 

शिक्षणमहर्षी कै.गौतमरावजी (बापू) नागरगोजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित चार दिवसीय स्मृतीसमारोहाची सांगता

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत
धर्मापुरी / प्रतिनिधी : ग्रामीण भागात सुध्दा गुणवत्ता ठासून भरलेली असून येथे गुणवत्तेची कसलीच कमतरता नाही. आपण मन लावून आणि जिद्दीने प्रयत्न केला तर कोणत्याही पदाला गवसणी घालू शकतो, असे प्रतिपादन आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा.चिराग सेनमा यांनी केले. ते धर्मापुरी ता.परळी (वै.) येथील जिजामाता प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणमहर्षी कै.गौतमरावजी (बापू) नागरगोजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित चार दिवसीय स्मृतीसमारोहाची सांगता समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती प्रतिष्ठानचे सचिव विजयकुमार गौतमराव बापू नागरगोजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर मुखेडचे प्राचार्य रामकृष्ण बदने, अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ.सरस्वती विजयकुमार नागरगोजे, प्राचार्य रामहरी शामराव गित्ते यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा.चिराग सेनमा यांनी दोन्ही प्रतिष्ठान मधील गुणवंताना, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊ असा शब्द देखील दिला. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व शिक्षणमहर्षी कै.गौतमराव बापू नागरगोजे, कै.शिवशलामाई गौतमराव बापू नागरगोजे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामहरी गित्ते यांनी केले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य रामकृष्ण बदने यांनी आईची महती, शिक्षणमहर्षी कै.गौतमराव बापू नागरगोजे यांचे ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांनी स्वतः च्या मधला स्वत्व शोधा आणि व्यसन व सोशल मीडिया पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. संस्थेच्या कार्यवाह डॉ.सरस्वती विजयकुमार नागरगोजे यांनी सर्व स्टाफचे कौतुक करुन हा सोहळा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले. यानंतर विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सुदर्शन गुट्टे, बाळासाहेब माले, सतिश शिरसाठ, महादेव फड, काशिनाथ कातकडे, प्रा.डॉ. केशव कातकडे, गुरूदास आश्रम घाटनांदूरचे तुकडोजी महाराज, प्रसाद नागरगोजे, व्यंकटी गित्ते, भास्करबापू फड, श्रीमती खंडाळे मॅडम, प्रतिष्ठान मधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.के.मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णू भताने यांनी मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!