धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; लातुरात आमरण उपोषण व रास्ता रोको

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर/ साईनाथ घोणे : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कांही जणांना ‘धनगड’ म्हणून दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करावे, यासह अन्य मागण्यांसाठी आठवडाभरापासून आमरण उपोषण करणाऱ्या दोघांना पाठिंबा म्हणून उपोषणाच्या सातव्या दिवशी सकल धनगर समाजाच्यावतीने गुरुवारी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास आमरण उपोषण चालूच ठेऊन रास्ता रोको स्थगित करण्यात आला. आंदोलनामुळे शहरातून अंबाजोगाई रोडकडे जाणारी आणि त्या बाजूने येणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांनीच आंदोलन स्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारावे, इतरांकडे आम्ही निवेदन देणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु समाजातील नेत्यांनी प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आमरण उपोषण चालूच ठेऊन, रास्ता रोको स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात दि. ५ जुलै शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात धनगर समाजाच्या प्रतिनिधी सोबत बैठक आयोजीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात समावेश करून अंमलबजावणी करावी, संभाजीनगर जिल्ह्यातील कांही जणांना ‘धनगड’ म्हणून दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करावे. या प्रमुख मागण्यांसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे व अनिल गोयेकर हे दोघे तरूण २८ जून पासून अमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी सातवा दिवस असून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व धनगर समाजाच्या अनुसूचीत जमातीची होत अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक याठिकाणी प्रशासनाच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल धनगर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!