धनगर समाज आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / प्रतिनिधि : गेल्या २८ जूनपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासह खिल्लारे कुटुंबियांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे या मुख्य मुख्य मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी धनगर योद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयेकर यांनी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. यानंतर राज्यात धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यासाठी धनगर समाजाच्या विविध न्याय मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि.१०) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत, माजी खासदार विकास महात्मे, भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सचिन सूर्यवंशी, सचिन दाणे, विशाल देवकते यांच्यासह धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीच्या सुरुवातीला धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका असून धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले. याबाबत “उद्या ११ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचे शिष्टमंडळ व कायदेतज्ञ” यांची एकत्रितपणे बैठक होऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे प्रमाणपत्र रद्द करावे या धनगर समाजाच्या मुख्य मागणीवर चर्चा करणार आहेत. या बैठकीत खिल्लारे कुटुंबियांच्या प्रमाणपत्रावर तोडगा निघू शकतो अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!