‘धनगर समाजा’च्या उपोषणाला जरांगे पाटलांची भेट; उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले,

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या आमरण उपोषणाचा बुधवारी, दि.१० जुलै रोजी १३ वा दिवस आहे. या आमरण उपोषण आंदोलनास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी भेट दिली आणि आंदोलकांच्या तब्येतीची परिस्थिती जाणून घेतली. भेटीदरम्यान मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर- मराठा एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी धनगर समाजाचे भाऊसाहेब हाके यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो देऊन श्री. जरांगे पाटलांचा सत्कार केला.
यावेळी मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील म्हणाले, उपोषण काय असते ते मला माहित आहे, नवीन उपोषण करणाऱ्यांचे खूप हाल होतात, धनगर समाज उपोषण आंदोलकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. धनगर समाजाची अनुसूचित जमाती आरक्षणाची मागणी रास्त आहे. सकल मराठा समाज धनगर आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी पाठीशी आहे. धनगर बांधवांनी एकमेकांतील मतभेद – वादविवाद विसरून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना पाठबळ द्यावे, ते तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी उपोषण आंदोलन करत आहेत. सरकारने ही धनगर समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. यावेळी अॅड.अनिरुद्ध येचाळे, कैलास होळकर, विजयकुमार घाडगे पाटील, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!