» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी तीन वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दत्तात्रय रामकिशन अडसूळ असे शिक्षा झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
फिर्यादी हा तत्कालीन ग्रामसेवक दत्तात्रय रामकिशन अडसूळ (तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय नळेगाव ता. चाकूर जि. लातूर) याला इंदिरा आवास योजनेच्या कामासाठी भेटला असता इंदिरा आवास योजनेच्या प्रतीक्षा यादी मध्ये नाव समाविष्ट करून घरकुल मंजूर करून देण्याच्या कामासाठी मदत करतो म्हणून आलोसे अडसूळ यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. फिर्यादीने याची तक्रार लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून २४ एप्रिल २०१२ रोजी सापळा लावला. यावेळी आलोसे दत्तात्रय रामकिशन अडसूळ याने दोन हजार रुपयांची लाच लातूर शहरातील सराफ लाईन परिसरात स्वीकारली. या प्रकरणी एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात फिर्यादी, पंच साक्षीदार व पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढे आलेल्या साक्षीपुराव्यावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आलोसे दत्तात्रय रामकिशन अडसूळ याला तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड.शिवनारायण रांदड यांनी काम पाहिले.