बदलीविरोधात आयजी शशिकांत महावरकर यांची ‘कॅट’मध्ये धाव

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

नांदेड / प्रतिनिधी : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात (कॅट) धाव घेतली आहे. सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असताना त्यांच्या बदलीचे आदेश आले. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते.

गृह विभागाने राज्यातील ७ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या ९ जुलै रोजी बदल्या केल्या आहेत. त्यानुसार शशिकांत महावरकर यांची बदली करीत त्यांच्या जागी शहाजी उमाप (अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली. तर महावरकर यांची पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. परंतु, या बदलीविरोधात महावरकर यांनी 'कॅट'मध्ये याचिका दाखल केली आहे.

मार्च २०२३ मध्ये महावरकर यांची नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक पदी बदली झाली होती. त्याच वर्षी एप्रिल २०२३ मध्ये त्यांच्या पदोन्नतीचे आदेश आले होते, त्यानुसार त्यांची नांदेड परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ९ जुलै रोजी महावरकर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच केवळ सव्वा वर्षाचा कार्यकाळ झाला असतानादेखील बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा महावरकर यांनी याचिकेत केल्याचे समजते. आपल्या चुकीच्या बदलीसंदर्भात त्यांनी कॅटमध्ये अर्ज केला. 

यावर गुरुवारी (दि. ११) 'कॅट'मध्ये सुनावणी झाली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार असून तोपर्यंत त्यांनी पदभार देऊ नये, अशा सूचना कॅटने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नांदेड परिक्षेत्राची सूत्रे घेण्यासाठी शहाजी उमाप हे शुक्रवारी नांदेडमध्ये दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांनी पदभार स्विकारला नव्हता. त्यामुळे निकालाकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!