मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्राची जमवाजमव करणाऱ्या भावाकडून मागितली लाच; प्रयोगशाळा सहायक एसीबीच्या जाळ्यात 

3 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आवश्यक शाळेचा दाखला देण्यासाठी तोगरी येथील उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहायकाला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जयप्रकाश बालाजी बिरादार, असे या प्रयोगशाळा सहायकाचे नाव आहे.
बिरादार हा उदगीर तालुक्यातील तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर येथे कार्यरत आहे. तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन २०१२-२०१३ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, तोगरी, ता. उदगीर येथे होती. सन २०१३ मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर ती मौजे मालेवाडी ता. गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेकरिता तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता, म्हणून तिचा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबतचा विनंती अर्ज तक्रारदार (विद्यार्थिनीचा सख्खा भाऊ) याने सोमवार दि.८ जुलै रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता. तक्रारदार यांनी दि.१२ जुलै रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता आलोसे बिरादार यांनी चारशे रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली. त्यावरून लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे बिरादार यांनी तक्रारदार यांच्याकडे चारशे रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर येथील कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे. आलोसे बिरादार यास सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. आलोसे बिरादार यास ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन देवणी, जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जुळविण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. हीच संधी साधून राज्यात सातत्याने लाच मागणीच्या घटना घडत असल्याने सरकारने कडक पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.

एसीबी चे नागरिकांना आवाहन 

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

- अँटी करप्शन ब्यूरो, लातूर

दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२६७४, टोल फ्रि क्र.१०६४
श्री. संतोष बर्गे, पोलीस उप अधीक्षक, मो.नं. ७७४४८१२५३५
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!