आगामी अहमदपूर- चाकूर विधानसभेसाठी जवळपास डझनभर लोकांनी गुडघ्याला बांधले बाशिंग

3 Min Read


लातूर लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये माजी आ.विनायक जाधव पाटील यांनी आघाडी धर्म पाळत पंज्याचं काम करताना 'साम दाम दंड भेद' या नीतीचा वापर करून डॉ. काळगे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी अहमदपूर-चाकूर विधानसभेचा ट्रेलर लॉन्च केला अन् निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आ.विनायक जाधव पाटील यांनी मतदारसंघातील जनता अजून आपल्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहे. भविष्यात निवडणुकीचा बदललेला फॅक्टर तसेच आघाडी-युती राहते किंवा नाही यावरदेखील सर्व गणित अवलंबून आहे. जर आघाडी-युती तुटली तर महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अनेक उमेदवारांशी सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरु आहे.



» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदार संघात मागील आठ विधानसभा निवडणुकींचा अनुभव पाहता विद्यमान आमदारांविरोधात जे उमेदवार उभे राहतात त्यापैकी जे शेवटपर्यंत निवडणूक आखाड्यात टिकतात तेच जिंकतात हाच आजवरचा अनुभव आहे आणि त्यामुळे सलग दुसऱ्यांदा कधीच कुणाला आमदारकीची संधी भेटली नाही आणि यंदा तर आमदार बाबासाहेब पाटील हे महायुतीत आहेत. राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) महायुतीत सामील झाल्याने महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदार संघात आमदार बाबासाहेब पाटील यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामाचे मूल्यमापन करण्यापेक्षा आजमितीला त्यांच्यासमोर उभे राहणाऱ्यांची संख्या मोजणे हे संयुक्तिक राहणार आहे. मागील कांही वर्षांपासून मनात विधानसभेची इच्छा ठेवून सर्वच राजकीय पक्षात कार्यरत असलेले आजमितीला आपण जनतेसाठी केलेल्या कामाचा फायदा घेण्यासाठी उमेदवारांमध्ये शर्यत लागली आहे. यामध्ये भाजपाचे माजी आ.बब्रुवान खंदाडे, दिलीप देशमुख, गणेश हाके, भारत चामे, अशोक केंद्रे, बालाजी पाटील चाकूरकर, अखिल भारतीय काँग्रेसकडून विक्रांत गोजमगुंडे , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून माजी आ.विनायक जाधव पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून २०१९ मध्ये उमेदवार असलेले विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख गोपाळ माने ही मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी तयार असल्याची चर्चा आहे. आजमितीला माजी आ.विनायक जाधव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून जनसंपर्क वाढवला आहे. माजी आ.विनायक जाधव पाटील हे प्रत्येक सर्कलमधील गावांचा दौरा करून लोकांचा कौल जाणून घेत आहेत तर काहीजण अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात बैठका घेऊन निवडणूक लढविणार असल्याचा मनसुबा जाहीर करत आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून २०१९ मध्ये उमेदवार असलेले विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनीदेखील रणांगणात उभं राहण्याची तयारी सुरू केली आहे. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांना मागील खेपेला डावलण्यात आल्याचा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, आता माघार घेणार नाही, असे त्यांनी ठरवले असून, ते देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. एकूणच या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास डझनभर लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजपाचे दिलीप देशमुख यांनी २०१९ विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी  ५४८४६ मते, माजी आ. विनायक जाधव पाटील यांना ५५४४५ मते तर आ.बाबासाहेब पाटील यांना ८४६३६ मते मिळाली होती. यंदा जर महाविकास आघाडीतून एकच उमेदवार दिला आणि जरांगे फॅक्टरचा अवलंब झाला तरच विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांची घोडदौड रोखणे शक्य होईल अन्यथा आ.बाबासाहेब पाटील यांचा विजयी रथ कुणीच थांबवू शकणार नाही.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!