डॉ.अनिल कांबळे भाजपला धक्का देणार ?, शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, उद्या होणार पक्षप्रवेश?

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर : राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, असं म्हटलं जात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला चारीमुंड्या चित केल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते डॉ.अनिल कांबळे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतल्याचे समोर आले. या भेटीनंतर लातूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर आता डॉ.अनिल कांबळे भाजपला लवकरच ‘दे धक्का’ देणार, अशी चर्चा सध्या सुरू असून डॉ.अनिल कांबळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा फटका बसू शकतो.

सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत कांही दिवसापूर्वी डॉ. अनिल कांबळे यांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि डॉ.अनिल कांबळे यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी खासदार फौजिया खान या त्यांच्यासोबत होत्या. २०१९ ची उदगीर विधानसभा निवडणुक डॉ.अनिल कांबळे यानी भाजपमधून लढविली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे संजय बनसोडे यांनी विजय मिळविला होता. उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुतीला विजय मिळू नये यासाठी शरद पवार दररोज नवनवी रणनिती आखताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणून कांही दिवसापूर्वी भाजपाचे दोन टर्म आमदार असलेले सुधाकर भालेराव यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला होता त्यानंतर आता डॉ.अनिल कांबळे यांना गळाला लावण्यात शरद पवार गटाला यश आलं आहे. जो एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील उभ्या फुटी नंतर लातूर जिल्ह्यातील उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे अजित पवार गटासोबत राहिलेले आहेत. यामुळे आता आ.संजय बनसोडे यांच्या विरोधात शरद पवार हे डॉ.अनिल कांबळे यांना ताकद देणार असल्याचे देखील बोललं जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!