मुखपत्र दक्षता वृतांत
सांगली : वांगी गावातील सुतार मळा येथे फिर्यादीचे घरी घरफोडी चोरी झाली असुन सदर घरफोडी चोरीत १५ लाख २० हजार रुपये चोरीस गेले असल्याचा चिचंणी वांगी पोलीस ठाण्यात गु.र.नं.१०९/२०२४ बी.एन. एस.२०२३ कलम ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देवून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीच्या गुन्ह्याची उकल होण्याकरिता मार्गदर्शन केले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वातील पथकाला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सदर गुन्हयात घरातील चोरीस गेलेली रोख रक्कम ही फिर्यादी यांनीच लपवून ठेवून घरफोडीचा चोरीचा बनाव रचला आहे अशी माहिती मिळाली. सदर पोलीस पथकाने या प्रकरणातील फिर्यादी किरण सिताराम कुंभार याचेकडे कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता, गुन्हयात चोरीस गेलेली रोख रक्कम ही त्यानेच राहत्या घरामध्ये लपवून ठेवली असल्याबाबत तपासामध्ये माहिती दिली. सदर घरफोडी चोरीचा बनाव रचण्या पाठीमागचे कारण विचारले असता, किरण कुंभार याने सांगितले की, सदरची रोख रक्कम त्याच्या भाच्याने थोड्या दिवसाकरीता विश्वासाने ठेवण्याकरीता दिली होती परंतु त्यातील काही रक्कम त्याने स्वतः साठी खर्च केली होती त्यामुळे सदरची रक्कम भाच्यास परत दयावी लागु नये व इतर रक्कम स्वतः वापरायला मिळेल यासाठी त्याने ती रक्कम स्वतःच्याच घरी लपवून ठेवून स्वतःच कपाटातील साहीत्य अस्ताव्यस्त करून घरफोडी चोरीचा बनाव तयार केला आणि स्वतःच्या घरी घरफोडी होवून १५ लाख २० हजार रुपये रक्कम चोरी झालेची स्वतःच फिर्याद देवून गुन्हा दाखल केला असल्याची कबुली दिली. तात्काळ पोलीस पथकाने वांगी येथे जावून किरण कुंभार याने त्याचे घरात लपवून ठेवलेली एकूण १०,६०,००० रुपये रक्कम पंचासमक्ष जप्त केली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी चिचंणी वांगी पोलीस ठाणे पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास चिचंणी वांगी पोलीस करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वात सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल ऐनापुरे, पोलीस अंमलदार सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, सुरज थोरात, रोहन घस्ते यांच्या पथकाने बजावली.