मुखपत्र दक्षता वृतांत
रेणापूर : मागील वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे ऊत्पादनात घट झाली तर यावर्षी मागील १५ दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने पिके पिवळी पडली असून खरीप हंगामातील नगदी पिके असलेले सोयाबीन, तूर, तिळ मूग, ऊडीद या पिकांचे नुकसान झाले आहे तेंव्हा नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. यंदा जुन महिन्याच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी होता त्यातच मृग नक्षत्रात ही पेरणी योग्य पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील तीळ, मुग, ऊडीद, या बरोबरच सोयाबिन व तुर पिकाची पेरणी केली केली आहे. पेरणी नंतर वेळेवर पाऊस पडत गेल्याने पिकेही डोलू लागली मात्र मागील १५ दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने पिकातील आंतरमशागत होऊ शकली नाही किवा पिकात तण वाढू नये साठी वापरण्यात येत असलेले तणनाशकही फवारता आले नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीची मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, रेणापूर तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.