मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : रात्रीच्यावेळी एका कपड्याच्या दुकानाचा पत्रा काढून साड्या व कपडे चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध रेणापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी दादा बब्रुवान पवार, वय 45 वर्ष राहणार पाथर्डी तालुका कळंब जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद) ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी करून त्याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये नवीन साड्या व कपडे मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीसह लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथील एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे व त्यामध्ये चोरलेले साड्या व कपड्याचा मुद्देमाल असल्याचे कबूल केले. त्यावरून नमूद आरोपीस त्याने चोरलेल्या मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे रेणापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. असून त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने बजावली.