शरद पवारांना किल्लारी भूकंपासह राजकीय भूकंपाना सामोरं जाण्याचा अनुभव; पक्ष आणि विचारधारेला सोडून बंडखोरी करणाऱ्या आमदारांना शरद पवारांची धास्ती?

4 Min Read

मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर / साईनाथ घोणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठी फूट पडून दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली. यापूर्वी अखंड राष्ट्रवादी असताना राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते- पाटील, पद्मसिंह पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसह थेट भाजपशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड पार ढासळलेला असताना त्यात पक्ष फुटीची भर पडली. परिणामी शरद पवार गटाला स्वतःचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली होती. राज्यातील पक्ष संघटना, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक बहुसंख्य मंडळी सत्तासोबतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर पुढे सरसावली. मोजकेच निष्ठावंत शिल्लक राहिले. त्यात पक्ष गेला, चिन्ह गेले, झेंडा गेला तरीही नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक शरद पवारांनी तेवढ्याच ताकदीने लढवली आणि त्यात स्ट्राईक रेट राखला. अशावेळी शरद पवारांचे जुने सहकारी विजयसिंह मोहिते- पाटील यांनी मात्र शरद पवारांना साथ देतांना दिसले. शरद पवार यांनी तब्बल ६० पेक्षा जास्त सभा घेऊन निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती तर अजित पवार हे भाजपच्या संगतीला गेल्यानंतर भाजपचे नेते इशारा करतील त्या पद्धतीने त्यांना लोकसभेबाबत निर्णय घ्यावा लागल्याचे पहायला मिळाले.

राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप झाला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आम्हीच फोडले अशी कबुलीच दिली होती. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दिलेला कौल जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने दिला. लोकसभा निवडणूक निकालाचा राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांवर मोठा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लोकसभेच्या निकालाचा परिणाम पुढील सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहतो, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. सन २००४ अथवा २००९ मध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत आले होते. सन २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत राज्यात यश मिळाले होते. दोन्ही वेळेला विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले होते. असाच कल यंदा कायम राहिल्यास महाविकास आघाडीला चांगले यश मिळू शकते. दुसरीकडे, भाजपच्या जागा कमी होणे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फारसा प्रभाव न पडल्याने महायुतीसाठी धोक्याचा इशारा मानला जातो आहे. त्यामुळे पराभवानंतर सावध झालेल्या राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात गरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच सर्व घटकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मविआतील जेष्ठ नेते शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उडी घेतली असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व आ. रोहित पवार हे राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन आढावा बैठक घेत आहेत. संघटना मजबूत करा, जिल्ह्यातून शरद पवार यांना ताकद द्यावी, असे आवाहन करत आहेत. आपला पाच दशकांपेक्षा अधिकचा राजकीय अनुभव पणाला लावत शरद पवार नावाच्या झंझावाताने बंडखोरी करणार्‍यांना तोंडघशी पाडण्याची किमया लोकसभा निवडणुकीत करून दाखवली होती. राष्ट्रवादीतील ज्या आमदारांनी पक्ष आणि विचारधारेला सोडून बंडखोरी केली, त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विरोधात युवकांना संधी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदारांची मोठी कोंडी होणार असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे. शरद पवारांना किल्लारी भूकंपासह राजकीय भूकंपाना सामोरं जाण्याचा अनुभव असल्याचा राजकीय जाणकारांचा अनुभव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!