अहमदपूर विधानसभा : महायुतीला समन्वय राखण्याचे आव्हान तर पारंपरिक मतदार राखण्याची आघाडीची धडपड

3 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

अहमदपूर (साईनाथ घोणे): गतवेळी अहमदपूर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आ.बाबासाहेब पाटलांना राष्ट्रवादी पुन्हा मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहे. मात्र यावेळेला आ. पाटील यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यांच्या उमेदवारीवरुन महायुतीमधील भाजपा नेते मंडळी, कार्यकत्यांमध्ये असलेली नाराजी अन् पक्षांतर्गत गटबाजी चिंता वाढविणारी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रस शरद पवार गटाने विनायकराव जाधव पाटलांची तोडीसतोड उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटाचे प्रमुख शरद पवार हे राज्यात वर्चस्व राखण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाची अग्निपरीक्षा असल्याने आगामी विधानसभेच्या प्रचारात अख्ये राष्ट्रवादी (एसपी) गट उतरला आहे. असे असले तरी वोटबँक राखण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) गटापुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अहमदपूर विधानसभेची निवडणूकीत काँटे की टक्कर होणार आहे.
वास्तविक पाहता भाजपातील एका गटाला राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत नको होते. त्यामुळे तो गट प्रचारात सक्रीय होणार? ते मनाने कितपत महायुतीचे संभाव्य उमेदवार आ.बाबासाहेब पाटील यांच्यासाेबत असतील हा खरा प्रश्न आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विद्यमान आमदार असताना मतदारसंघातून लोकसभेला महायुतीला निसटते अल्प मताधिक्य देता आले. यावेळी ते टिकविण्याचे आव्हान आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार आ. बाबासाहेब पाटील पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत आहेत. मात्र भाजपातील नेतेमंडळी एका बाजूला आणि आ. बाबासाहेब पाटील एका बाजूला असे चित्र आहे. तर दुसरीकडे मविआचे संभाव्य उमेदवार विनायकराव जाधव पाटील प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मतदानाच्या दिवशीपर्यंत हीच स्थिती राहील का? हा येणारा काळच ठरविणार आहे. परंतु येत्या काळात राष्ट्रवादी -राष्ट्रवादी (एसपी) मध्ये अटीतटीची लढत होणार आहे.

गटबाजी रोखल्यास राहू शकते वेगळे चित्र

महायुतीत असलेले भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट एकत्र आहेत. त्यात आ.बाबासाहेब पाटील यांच्या उमेदवारीवरुन अहमदपूर – चाकूर भाजपात नाराजी आहे. दिलीपराव देशमुख हे भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांचे आमदारकीच्या स्वप्नाबाबत काही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ते आ. बाबासाहेब पाटील यांच्यासाठी प्रयत्न करतीलच असे छातीठाेकपणे सांगणे कठीण आहे. भाजपाचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीतील गटबाजी रोखण्याचे आव्हान आ.बाबासाहेब पाटील यांच्या समोर आहे. ही गटबाजी रोखण्यात आ. पाटील कितपत यशस्वी होतात यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात लावला जोर

मविआचे संभाव्य उमेदवार माजी राज्यमंत्री विनायकराव जाधव पाटील हे प्रचारात सक्रीय आहेत. त्यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघात बैठका, प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात अहमदपूर व चाकूर अशी दोन तालुके येतात. त्यातील अहमदपूर तालुक्यात त्यांचे मूळगाव आहे. तेथून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात भाजपात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. यांना डावलून भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी दिल्यास भाजप कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात जोर लावला आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे या दिग्गजांच्या सभा विधानसभेची तारीख जाहीर होण्यापूर्वीच झाल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!