खिल्लारे कुटुंबियांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘धनगर जमाती’चे दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरु 

2 Min Read

मुखपत्र दक्षता वृतांत

लातूर/ प्रतिनिधी : धनगर समाजाला घटनेत अनुसूचित जमातीत आरक्षण दिलेले आहे. याची अंमलबजावणी करावी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र रद्द करावे, यासाठी मल्हार योद्धे चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी २८ जून ते १३ जुलै असे १६ दिवस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण केले. याची शासनाने दखल घेऊन ३० जुलै रोजी सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्र्यांसोबत या आंदोलनकर्त्यांची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली होती, संबधित कारवाईसाठी शासनाचे दहा दिवसांचा कालावधी मागितला होता. परंतु सरकारकडून दीड महिना उलटला तरीही कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सोमवार दि.९ सप्टेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर जमातीच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले असल्याची माहिती आंदोलनकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी आंदोलकांचा उत्साह वाढवत पाठिंबा देण्यासाठी बसवेश्वर हालकुडे (पानगावकर), महेश भिंगे, सुभाष लवटे, ॲड.शेषराव हाके पाटील, सोनाजी भंडे, दत्ता वाघमोडे, शाम माने, ज्ञानेश्वर गुट्टे, विष्णू पोले, संतोष रेड्डी यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

खिल्लारे कुटुंबियांचे बोगस प्रमाणपत्रामुळे दीड कोटी धनगर जमात अडचणीत – मल्हारयोद्धा अनिल गोयकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे बोगस प्रमाणपत्रामुळे राज्यातील दीड कोटी धनगर जमात अडचणीत आली आहे. कागदपत्राची पडताळणी करून सरकारने तात्काळ खिल्लारे कुटुंबियांचे बोगस प्रमाणपत्र रद्द केले पाहिजे. जोपर्यंत हे बोगस प्रमाणपत्र रद्द होण्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहिल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!