संजय बनसोडे यांच्या ‘उदगीर-जळकोट’ मध्ये राष्ट्रवादीची यंदा डोकेदुखी ; उदगीरची बदलती समीकरणे कुणाच्या पथ्यावर ?

5 Min Read

साईनाथ घोणे 

उदगीर: मागील कांही वर्षांपासून भाजपसाठी अनुकुल समजल्या जाणाऱ्या उदगीर- जळकोट मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे विजयी झाले. सध्या संजय बनसोडे महायुतीच्या सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीर मतदार संघात राष्ट्रवादी व भाजपात संघर्ष पहायला मिळत आहे. संजय बनसोडेंच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहेत. अर्थात तत्कालीन भाजपा नेते सुधाकर भालेराव, डॉ. अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे परंतु, महायुतीतील घटक पक्षांचे काही नेते संजय बनसोडे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करून त्यांना आव्हान देऊ लागले आहेत. संजय बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवरून महायुतीतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचे वातावरण आहे. मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच संजय बनसोडे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावोगाव जाऊन बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार सुरू केला आहे. भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत. शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेचे पडघम वाजू लागले आहे. महायुतीतील घटक पक्षातून काहीजण बाहेर पडले तर काहींनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती बळ देतात यावर बनसोडे यांच्या विरोधातील वातावरण अवलंबून राहणार आहे. 

उदगीर मतदार संघात निवडून येण्याच्याही आधीपासून संजय बनसोडे यांचे मतदार संघात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने या ना त्या कारणावरून मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा केला. विधानसभेच्या विजयानंतर संजय बनसोडे यांनी सर्वपक्षीय अनेक पदाधिकारी आपल्याकडे वळवले. असे असतानाही कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र अद्याप उदगीर विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही.

( लातूर जिल्ह्यातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मुखपत्र दक्षता व्हॉट्सॲप चॅनेल जॉईन करा लिंक – https://whatsapp.com/channel/0029VaElDqqFMqreZLkjgl3I )

 

मंत्रीपद देणारा मतदारसंघ

१९८५ पासून उदगीरमध्ये विजयी झालेल्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली नव्हती. त्यात २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद, महायुतीमध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रीपद मिळाले. त्यामुळे हा मतदारसंघ लातूर जिल्ह्याला मंत्रीपद देणारा मतदारसंघ ठरला आहे.

 

महायुतीमध्ये दावेदारांची संख्या अधिक

■ राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अजित पवार गटाकडून पुन्हा जोरदार तयारी केली आहे. उदगीर- जळकोट मतदारसंघात एकत्रित राष्ट्रवादीची ताकद मोठी होती.परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही ताकद विभागली गेली त्यामुळे मतदारसंघात संजय बनसोडे यांना भाजपची साथ लाभणे आवश्यक ठरणार आहे. तर मराठवाड्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात कुठेही दोन पाऊल मागे येता येणार नाही, पण उदगीरात अजित पवार गटासाठी जागा सोडता येईल असा विचार भाजपचे नेतृत्व करत आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

■ भाजपाचे इंजि.विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा चालवला आहे. गायकवाड हे माजी खा. सुनील गायकवाड यांचे पुतणे असल्याने त्यांना भाजपातूनही पाठबळ मिळू शकते. शिवाय समाज माध्यमात सक्रिय असलेले आणि आपल्या सामाजिक फौंडेशनच्या निधीचा विनियोग समाजकार्यासाठी करणारे इंजि.विश्वजित हे तरुणांमध्ये लोकप्रिय बनले आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार का, याबद्दल तर्कवितर्क आहेत.

■ या मतदारसंघात माजी खा. सुधाकर शृंगारे यांनीही आपली प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा केला.

■ तर कांहीजण भाजपचे निष्ठावंत या श्रेणीतून उमेदवारी मिळेल अशी खात्री व्यक्त करताना दिसत आहेत. यामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला याचे उत्तर या क्षणी कोणाच्याच हातात नाही.

 

महाविकास आघाडीकडून कोण?

उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापेक्षा काँग्रेस पक्षाची ताकद चांगली आहे. सहकारातील अनेक संस्थांवरही काँग्रेसचे वर्चस्व आहे. उदगीर नगरपरिषदेत दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी महायुतीकडून या मतदारसंघात कडवे आव्हान मिळणार असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून ताकदीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तूर्तास, काही मधल्या फळीतील कार्यकर्त्यांची नावे पुढे येत आहेत. तरी सक्षम उमेदवार कोण याचे उत्तर मात्र मिळत नाही. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलेले माजी आ. सुधाकर भालेराव ही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. जोडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काही वजनदार मंडळी उमेदवारीसाठी घोड्यावर बसली आहेत.

 

सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची शिंदे गटाची ओरड 

कांही दिवसापूर्वी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी संजय बनसोडे यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची खंत व्यक्त करून ना. बनसोडे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपुर्वक वागवावे, महायुतीचा धर्म पाळावा अशी विनंती केली होती.

 

भाजपची उदगीरच्या जागेवर अडचण

 उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अजित पवार गटातील विद्यमान आमदार संजय बनसोडे यांना ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली, तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध लढणाऱ्या भाजपची उदगीर मतदारसंघांमध्ये पंचाईत होणार आहे. नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजूतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!