साईनाथ घोणे
लातूर : पार्टी विथ डीफरन्स म्हणून ओळख असलेल्या भाजपातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अंतर्गत वाद हा विधानासभेच्या तोंडावर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी न होता विधानसभा डोळयासमोर ठेवून वेळोवेळी काँग्रेसकडून सुपारी घेवून भाजपाला विस्कळीत करण्याचे आणि कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भाजपातून तात्काळ निलंबीत करावे, अश्या आशयाची मागणी रेणापूर तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून यामुळे लातूर ग्रामीण भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचे दिसत आहे. प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत आमदारकी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या कव्हेकरांसाठी यावेळी देखील त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न मृगजळच ठरणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
महायुतीत जागा सेनेकडे, भाजपातील दोन गटातील वाद चव्हाट्यावर
कांही दिवसांवर विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आ. धीरज देशमुख यांच्या विरोधात महायुतीतील शिवसेनेकडे ही जागा असताना भाजपातील दोन गट उभे राहिले आहेत. तसंच भाजपातील नेत्यांमधील आपसातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचे दिसते. ही जागा भाजपला सुटणार की सेनेला हे अदयाप ही स्पष्ट नसताना या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीची मागणी करणाऱ्या कव्हेकरांची अवस्था म्हणजे बाजारात तुरी अन भट भाटणीला मारी, अशीच झाली आहे असेच म्हणावे लागेल.
कव्हेकरांकडून जरांगे, ठाकरे यांची भेट
कांही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आले असता माजी आ. कव्हेकरांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीतून देखील त्यांनी स्वतःच्या पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम अवस्था निर्माण केला होता. याशिवाय मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील राजकीय आखाड्यात उतरणार आहेत याची कुणकुण लागताच त्यांच्याकडुन ही उमेदवारी मिळवण्या संदर्भात चाचपणी सुरु केल्याची चर्चा मतदार संघातील राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होती.
माजी आ. कव्हेकरांचा शहर, ग्रामीणवर दावा
कांही दिवसापूर्वी भाजपा नेते माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पत्रकार परिषदेत आपला लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदार संघावर दावा करून उमेदवारी मिळविण्यासाठी एक प्रकारे पक्षावर दबाव टाकण्याचाच हा प्रकार होता. अशी चर्चा भाजपच्याच गोटातून चर्चीली जात आहे.