नांदेड : पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी आदेश काढून आणखी एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. नांदेड पोलिसांची ही ९ वी कार्यवाही आहे.
जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भूमिका पोलिसांनी घेतली असून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची इत्यंभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. आशा कार्यवाही अंतर्गत दिपक ऊर्फ लोल्या पि. तारासिंग मोहील ऊर्फ ठाकुर वय २८ वर्षे व्यवसाय बेकार रा. चिरागगल्ली इतवारा, नांदेड याच्यावर दरोडा, जबरी चोरी, चोरी, अवैध अग्नीशस्त्र बाळगणे असे गंभीर एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. तो सतत गुन्हे करीत होता. त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक इसम बनला होता. म्हणुन पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सदर प्रकरण इतवारा पोलीसांच्या मार्फतीने सदर इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८१ (एम.पी.डी.ए.) चे कलम ३ (१) अन्वये कार्यवाहीच्या प्रस्तावानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्यातून एक वर्षाकरीता आरोपीला कारागृहात स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.