लातुरकरांच्या आशीर्वादाचं फलित म्हणजे मराठवाडा रेल्वे कोच कारखाना- आ. संभाजी पाटील निलंगेकर

3 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत

वंदे भारतची निर्मिती

लातूर येथे सुरु होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्यात जगात लोकप्रिय ठरलेल्या व सर्वाधिक मागणी असणार्‍या वंदे भारत कोचची तसेच वंदे भारतच्या स्लीपर कोचची निर्मिती होणार आहे.लातूर येथे तयार होणारे कोच देशात व जगात जाणार आहेत.त्यामुळे लातुरचे नाव जगभर होणार असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.

लातूर : येथे उभा राहिलेला मराठवाडा रेल्वे कोच कारखाना म्हणजे लातूरकरांच्या आशीर्वादाचे फलित आहे. या कारखान्याचे मंगळवार दि.12 मार्च रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

आ.निलंगेकर म्हणाले की, 2017-18 या कालावधीत लातूरकर जनता भाजपाच्या पाठीशी उभी राहिली. या काळात लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसह नगरपंचायतीमध्ये जनतेने भाजपाला निवडून दिले. या पाठबळावर आम्ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना सुरू करण्याची विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे आमच्या भावना पोहोचवून पाठपुरावा केला. लातूरकरांसाठी रेल्वे बोगी कारखाना मंजूर करून घेतला.लातूरच्या जनतेने भाजपावर आणि आमच्यावर विश्वास व्यक्त केला.त्यामुळे आम्ही पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला. वरिष्ठ नेत्यांनी त्याची देखील घेतली.या सर्वांचे फलित म्हणूनच लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्याचे मंगळवारी (दि.12) लोकार्पण होत असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी 8 वाजता आभासी पद्धतीने लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे- पाटील,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.याशिवाय जिल्ह्यातील खासदार, आमदार व मान्यवर नेत्यांची उपस्थिती कारखानास्थळी राहणार असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

लातूर परिसरात रोजगार निर्मिती व्हावी,या भागातील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागू नये यासाठी हा कारखाना व्हावा यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता.तो सफल झाला आहे.या माध्यमातून जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.त्यामुळे आता जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही.जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.रेल्वे बोगी कारखान्यास लागणार्‍या इतर साहित्य निर्मितीचे उद्योग जिल्ह्यातच सुरु होणार आहेत.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे.जिह्यातील तरुणांना स्वतः उद्योग उभे करण्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे.यामुळे लातूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले. जिल्ह्याचा कायापालट करणार्‍या या कारखान्याच्या शुभारंभास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.निलंगेकर यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!