काँग्रेसकडे प्रभावी व सक्षम उमेदवार नसणे हीच भाजपाची जमेची बाजू?

2 Min Read

>> मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर / साईनाथ घोणे : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सध्या तरी प्रभावी व तुल्यबळ उमेदवार नसणे ही भाजपाची जमेची बाजू मानली जात आहे. मात्र असे असले तरी यंदा प्रथमच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मोठया ताकतीने उमेदवार देणार असल्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघात लढत रंगतदार होणार आहे. त्यांच्या लातूर जिल्ह्यातील संवाद बैठकांना मोठया प्रमाणात प्रतिसाद पहायला मिळाला होता. मात्र महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात अजूनही ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. अवघ्या दीड महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. याची जाणीवच महाविकास आघाडीतील नेत्यांना नसल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी ऐनवेळी बाहेरचा उमेदवार देऊन धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला लातूर जिल्हा गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपमय झाला आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र गावोगावी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाची माहिती देण्याचे काम सुरू झाले आहे. जाहिरातींचा भडिमार सुरू आहे. तसा भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये राहणारा पक्ष आहे. राम मंदिराची उभारणी, सीएएची अधिसूचना, ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भातील हालचाली, रेल्वे बोगी कारखाण्याच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना काम देत असल्याचे भासवीत, साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून विरोधी पक्षातील प्रभावी मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना पक्षप्रवेश देऊन पावन करण्याची नीती, या पार्श्‍वभूमीवर ‘अबकी बार चारसौ पार’चे स्वप्न सत्ताधारी पक्ष बघत असल्याचे चित्र आहे. ५४३ लोकसभा जागांपैकी ४०० म्हणजे ७५ टक्के जागा जिंकण्याच्या गणितावर भाजपा काम करताना दिसत आहे. भाजपच्या प्रचार सभांना महिनाभरापूर्वी पासूनच सुरुवात झाली असून विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देऊन पुन्हा एकदा विजय मिळवत हॅट्रीकचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत तर दुसरीकडे इंडियाची गाडी जागावाटपावरच अडून बसली आहे. येत्या ७ मे ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडी (इंडिया आघाडी) कुणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!