लातूर लोकसभा मतदारसंघ : महायुतीच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीला तोडीस तोड स्थानिक उमेदवार सापडला

2 Min Read

>> मुखपत्र दक्षता वृत्तांत 

कोण आहेत डॉ. शिवाजी काळगे

उच्चशिक्षित असलेले डॉ. शिवाजी काळगे हे राणी अंकुलगा, ता. शिरूर अनंतपाळ येथील रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राणी अंकुलगा, माध्यमिक श्री देशीकेंद्र लातूर, उच्च माध्यमिक राजर्षी शाहू महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झाले आहे. लातूर येथे त्यांचे नेत्र रूग्णालय आहे. विविध संघटनावर पदाधिकारी, सदस्य असलेले तथा अनेक वर्षांपासून रुग्णालयाच्या माध्यमातून लातूरकरांना वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शिवाजी काळगे यांचा लातूर-नांदेड जिल्ह्यात मोठा मित्र परिवार आहे. याशिवाय त्यांचे वडील बंडप्पा काळगे हे पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत राहिले आहेत त्यांना मानणारा ही जिल्ह्यात मोठया प्रमाणात मित्र परिवार आहे. काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचे तगडे आव्हान महायुतीसमोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लातूर : देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती यांच्या जागावाटपाचा पेच सुटल्याचं चित्र नाहीये. भाजपने वीस जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली असून लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राज्यात अजूनही काँग्रेस -शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामधला जागा वाटपाचा सस्पेन्स कायम आहे. मात्र लातूर मतदारसंघात येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचं एकमत झालं असल्याची माहिती समोर येत आहे. लातूर लोकसभा मतदार संघातुन डॉ. शिवाजी काळगे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा लिंगायत समाजाचे नेते शिवराज पाटील चाकूरकर हे तब्बल सात वेळा निवडून गेले आहेत. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे हे शेकापचे राज्य स्तरावरील ज्येष्ठ नेते भाई बंडप्पा काळगे यांचे चिरंजीव आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लिंगायत समाजाची पोट जात असलेल्या जंगम समाजातील उच्चशिक्षित डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावाची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. स्थानिक व लिंगायत उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात येत असल्याने महायुतीला हॅट्ट्रिक साधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!