प्रचाराचे रुप पालटले ; समाजमाध्यमांचा वापर वाढला, मतदान होईपर्यंत उमेदवार मतदारांच्या संपर्कात

2 Min Read

देशाच्या राजकारणात वाईट, भ्रष्ट, कामचुकार, संधीसाधू, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा भरणा अधिक झाला आहे, असे नेहमीच म्हटले जाते. देशात सध्या १७ व्या लोकसभेचा कालावधी संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक अगदी कांही दिवसांत होणार आहे. राज्यातील ४८ जागांसाठी मार्च / एप्रिल आणि मे महिण्यात विविध टप्प्यांत मतदान होणार आहे. अशावेळी कांही राजकीय पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत. या सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी विविध प्रकारचे मार्ग अवलंबले जात आहेत. समाजमाध्यमांची चलती सुरू झाल्यानंतर प्रचाराचे रूप पालटून गेल्याचे दिसते. अत्याधुनिक माध्यमांचा प्रचारासाठी वापर करण्यात कांही पक्ष आघाडीवर आहेत. मतदारापर्यंत पोहोचण्याची, आपले नॅरेटिव्ह सेट करून निवडणूक जिंकण्याची एकही संधी सध्या हे राजकीय पक्ष सोडताना दिसत नाहीत. याबरोबरच  इच्छुक उमेदवार सध्या एखाद्याचे आमंत्रण असो किंवा नसो फक्त मतदानाच्या तोंडावरच मतदारसंघातील लग्नाला, डोहाळे जेवण, सप्ता, भंडारा, वाढदिवस व एखाद्या नागरिकाची ओळख असो किंवा नसो अंत्ययात्रेला हजेरी लावतानाचे सर्वत्र चित्र दिसत आहे परंतु हीच मतदारांसाठी सुवर्णसंधी आहे. कसल्याही अमिषाला, जातीय धार्मिक प्रांतीय व अन्य कसल्याही भूलथापाना बळी न पडता आपला थोडा वेळ खर्ची घालून वाईट, भ्रष्ट, कामचुकार, संधीसाधू, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या विरोधात मतदान रुपी अस्त्राचा अचूक वापर करावयास हवा. मतदान होईपर्यंत उमेदवार मतदारसंघात प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावून मतदारांना आकर्षित करत असतो. भावनिक करत असतो. मोह घालत असतो. या मोहाला बळी न पडता सामाजिक व संसदीय लोकशाहीसाठी आवर्जून मतदान केले पाहिजे. ‘मतदान करणे म्हणजे संविधानाचा सन्मान राखणे,’ हाच सन्मान मतदारांकडून घटनाकारांना अपेक्षित आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!